परभणी : हळद उत्पादनासाठी विकसित केली सहा औजारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:28 AM2019-07-24T00:28:01+5:302019-07-24T00:29:33+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी हळद पिकाच्या लागवडीपासून ते काढणी आणि बाजारपेठतील विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणारी सहा औजारे विकसित केली आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून या औजारांची निर्मिती करण्यात आली असून, हळद लागवड करताना महिलांचे श्रम या औजारांमुळे कमी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधकांनी हळद पिकाच्या लागवडीपासून ते काढणी आणि बाजारपेठतील विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेचा अभ्यास करुन वेगवेगळ्या टप्प्यांवर लागणारी सहा औजारे विकसित केली आहेत. महिलांना केंद्रस्थानी ठेवून या औजारांची निर्मिती करण्यात आली असून, हळद लागवड करताना महिलांचे श्रम या औजारांमुळे कमी होणार आहेत.
हळद पीक उत्पादनातील महिला केंद्रित कार्यासाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वरिष्ठ संशोधिका डॉ.जयश्री झेंड, संशोधन सहयोगी मंजुषा रेवणवार, वरिष्ठ संशोधक स्वाती गायकवाड यांनी हळद उत्पादन प्रक्रियेचा संपूर्ण अभ्यास केला. पीक उत्पादन पद्धतीत लावणीपासून ते काढणीपर्यंत केल्या जाणाऱ्या कामांमध्ये महिला आणि पुरुषांचा सहभाग असतो.
काडी कचरा वेचणे, शेत तयार करणे, रोपांच्या मुळाशी माती लावणे, तण, गवत काढणे, खत देणे, फवारणी करणे, कंद व मातृकंद वेगळे करणे, हळद शिजवणे, वाळवणे, पॉलिशिंग करणे आदी कामे महिलांच्या माध्यमातून केली जातात.
या सर्वेक्षण आणि अभ्यासातून अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पांतर्गत काडी कचरा वेचणे, हळद कंद लावणी यंत्र, माती उकरण्याचे साधन, तण काढणे आदी औजारे तयार करण्यात आली असून, ती उपयुक्त ठरत आहेत.
काडी कचरा वेचणी यंत्र : शेतातील हे काम शेत तयार करण्याच्या आधी म्हणजे मे-जून महिन्यात करावे लागते. शक्यतो महिला ही कामे करतात. यासाठी विद्यापीठाने दातळे हे यंत्र तयार केले आहे. या दाताळ्यांचा वापर केल्यास त्यांची काम करतानाची शारीरिक संस्थिती सुधारते, काम जलदगतीने होते तसेच हात सुरक्षित राहतात.
सावडी व खुरपे: तण काढण्यासाठीही खुरपे विकसित केले आहे. नवीन खुरप्याचा वापर केल्यास पारंपरिक खुरप्यापेक्षा ९ टक्के काम अधिक प्रमाणात होते.
हळदीच्या रोपांच्या मुळांना माती लावणे : हळद रोपांच्या मुळांना माती लावताना पुरुष मंडळी खोºयाचा वापर करतात. मात्र महिलांना खोºयाचा वापर करुन माती लावणे शक्य होत नाही. कारण खोरे वजनदार असते. त्यामुळे महिला तुटलेल्या पाईपचा तुकडा, स्टीलची थाळी अशा साधनांचा वापर करतात. विद्यापीठाच्या प्रकल्पांतर्गत माती लावण्यासाठी सावडी हे साधन तयार करण्यात आले आहे. या साधनाला लाकडी मूठ असल्याने हाताची पकड चांगली बसते. सावडी वापरुन माती लावण्याचे काम केल्याने दर तासाला २२ टक्के काम जास्त होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
उकरी व नखाळ्या : माती उकरुन कंद लावावा लागतो व नंतर त्यावर माती झाकावी लागत. त्यामुळे बोटांना इजा होण्याची शक्यता असते. काही महिला यासाठी खुरप्याचा वापर करतात. परंतु खुरप्याने उकरताना कामाचा वेग मंदावतो. यासाठी प्रकल्पांतर्गत माती उकरण्याचे साधने म्हणजे उकरी व नखाळ्या ही साधने तयार केली आहेत. या साधनांच्या वापराने २६ टक्के काम जलद गतीने होते. तसेच नखाळ्यांचा संच बोटात घालून लावणी केल्यावर लावणीचे काम १३ टक्क्यांनी वाढते, असे संशोधकांचा निष्कर्ष आहे.
खत देणे यंत्र : खत पेरणीच्या कामात तीन व्यक्ती सहभागी होतात. कारण एका गादी वाफ्यावर दोन ओळ लावल्या जातात. या ओळीमध्ये जर खत दिले तर ते थेट मुळांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हे काम करीत असताना एक महिला दोन रोपांच्या मधोमध माती उकरते. हे उकरण्याचे काम पारंपरिक पद्धतीमध्ये खुरप्याच्या साह्याने अथवा हाताने केले जाते. त्यानंतर एक महिला बकेटमध्ये खत घेऊन वाकून खत टाकते तर एक महला त्यावर माती टाकून बुजविते. त्यामुळे खत वाहून नेण्यासाठी संशोधकांनी बकेट ऐवजी सुलभा बॅग तयार केली आहे. या बॅगमुळे महिलांचे दोन्ही हात मोकळे राहतात व खत पेरणीचे कामही सोयीस्कर होत आहे.
हळद काढणीसाठी मोजे : हळद काढणीसाठीही पारंपरिक लोकरी मोजे वापरले जातात. हे मोजे एका दिवसात फाटतात. यासाठी प्रकल्पांतर्गत विकसित केलेले सोयाबिन हातमोजे वापरल्यास महिलांचे हात सुरक्षित राहतात. तसेच महिलांना जाणवणारा थकवाही कमी होतो.
दाताळे : हळद वाळवणीसाठी लाकडी दाताळे विकसित केले आहे. या दाताळ्याचा वापर करुन हळद खाली-वर करणे सोपे जाते. तसेच कामाची गती प्रति क्विंटल १० टक्क्यांनी वाढते, असे विद्यापीठ संशोधकांनी सांगितले.