परभणी : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांची आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:08 AM2020-01-08T00:08:36+5:302020-01-08T00:09:15+5:30
कामगार, कष्टकरी, कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना तसेच कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कामगार, कष्टकरी, कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना तसेच कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यात बुधवारी विविध संघटनांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे व्यापारपेठ तसेच मोंढा बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील खाजगी कापूस खरेदी व भुसार खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी संपचे आवाहन केले असले तरी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक अद्यादेश काढून सर्व कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार शासकीय कर्मचाºयांना संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून संपात सहभागी झाल्यास कर्मचाºयांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी दौंड यांनी काढले आहेत.
महसूल कर्मचारी संपात
४महाराष्ट्र राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ८ जानेवारीच्या संपात सहभागी होणार असल्याची माहिती परभणी जिल्हा गट क महसूल कर्मचारी संघटनेने दिली आहे. देशभरातील महागाईचा उच्चांक, आर्थिक मंदी, बेरोजगारांची समस्या, खाजगीकरण, कंत्राटीकरण या धोरणाविरुद्ध ८ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्याच प्रमाणे राज्यातील महसूल कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, महागाई भत्याची थकबाकी, पाच दिवसांचा आठवडा करावा, अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी कर्मचाºयांच्या वारसांना तातडीने नियुक्ती द्यावी, जुलै २०१९ पासूनचा पाच टक्केचा महागाई भत्ता प्रदान करावा आदी मागण्या प्रलंबित आहे. या सर्व प्रश्नांवर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, विजय मोरे यांनी दिली.
अंगणवाडी सेविकांचा मोर्चा
४महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. अंगणवाडी कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांचा दर्जा देऊन तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीचे लाभ द्यावेत. केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्याच्या धर्तीवर अंगणवाडी कर्मचाºयांना न्याय द्यावा. ३० जून २०१८ च्या शासन नियमाप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचे भाडे सुधारित करावे, आदी सुमारे १२ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख, दत्ता देशमुख, बाबाराव आवरगंड आदींनी केले आहे.
कामगार संघटनेचा संप
४केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी जिल्हा कामगार संघटनेने ८ जानेवारी रोजी संप पुकारला आहे. प्रस्तावित कामगार कायदे रद्द करावेत, सर्व क्षेत्रातील खाजगीकरण बंद करावे, या प्रमुख मागण्यांबरोबरच २१ हजार रुपये किमान वेतन द्यावे, समानकामाला समान वेतन द्यावे, कंत्राटी पद्धत बंद करावी, अशा ११ मागण्या या संपाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत, अशी माहिती परभणी जिल्हा मजदूर युनियनचे कॉ.रामराजे महाडिक, कॉ.शेख महेबुब, शेख मेहताब, शेख शब्बीर, शेख नबी आदींनी दिली.