परभणी : सोळागाव पाणीपुरवठा योजना पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:39 AM2018-06-23T00:39:30+5:302018-06-23T00:40:30+5:30
जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़
जिंतूर तालुक्यातील बोरी व कौसडी या गावांना सोळा गाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो़ गतवर्षी या योजनेकडे महावितरणचे विज बील थकले होते़ त्यामुळे बोरी व कौसडी गावातील पाणीपुरवठा बंद झाला होता़ यावर्षी जानेवारी महिन्यापासून बोरी व कौसडी येथे पाणीटंचाई जाणवत असल्याने ही योजना सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत होती़
कौसडी येथे ग्रामस्थांनी आंदोलनही केले़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने थकीत बिलाचा भरणा करण्यात आला होता़ योजना सुरू झाल्याने ग्रामस्थांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, १५ दिवसांपासून ही योजना देखभाल दुरुस्तीअभावी पुन्हा बंद पडली आहे़ विशेष म्हणजे निवळी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा असूनही केवळ नियोजनाअभावी ही योजना बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़