परभणी : खडकपूर्णा काही भरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:58 AM2018-10-03T00:58:30+5:302018-10-03T00:59:07+5:30
येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़
विजय चोरडिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : येलदरी धरणाच्या वरच्या बाजूला खडकपूर्णा धरण झाल्यापासून येलदरी धरण एकदा पूर्ण क्षमतेने भरले असून, यंदा तर केवळ ९ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचाही प्रश्न तीव्र बनला आहे़
पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात २००९ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा धरण बांधण्यात आले आहे़ तेव्हापासून २०१३ हे वर्ष वगळता एकदाही येलदरी धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही़ या धरणावर ६० हजार हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ वर्षांत या भागातील शेतकरी पाण्याअभावी आर्थिक संकटात सापडला आहे़
यावर्षी धरणात केवळ ९ टक्के पाणीसाठा आहे़ यात गाळ किती व पाणी किती हे सांगणेही कठीण आहे़ दहा वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाने गाळाचे सर्वेक्षण केले होते़ त्यावेळी १४ टक्के गाळ असल्याचे स्पष्ट झाले़ आता हे प्रमाण १८ टक्क्यांपेक्षा जास्त झाले असावे़ करपरा या मध्यम प्रकल्पात ७६ टक्के पाणीसाठा आहे़ प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने तो किती दिवस पुरेल हेही सांगता येत नाही़
या दोन मध्यम प्रकल्पांसह पाटबंधारे विभागाच्या कवडा लघु तलावात ५२ टक्के, भोसी लघुतलावात ८ टक्के, मांडवी लघु तलावात ८० टक्के, दहेगाव लघुतलाव १५ टक्के, केहाळ लघु तलाव २१ टक्के, आडगाव लघुतलाव १७ टक्के, चिंचोली लघुतलाव १६ टक्के, देवगाव लघुतलाव ५७ टक्के, जोगवाडा लघु तलाव ९० टक्के, चारठाणा लघु तलाव ८३ टक्के तसेच पाडळी लघु तलावात ५५ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे़ खडकपूर्णा धरणात यावर्षी शून्य टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असून, सिद्धेश्वर धरणात २५ टक्के पाणीसाठा आहे़ निसर्गाने यावर्षी पाठ फिरवल्याने भविष्यात तीव्र जलसंकटाला तोंड द्यावे लागणार आहे़
५ शहरे व २०० : गावांचा पाणीप्रश्न गंभीर
येलदरी व सिद्धेश्वर धरणाच्या पाण्यावर जिंतूर, हिंगोली, वसमत, पूर्णा व परभणी ही पाच प्रमुख शहरे अवलंबून आहेत़ याशिवाय पिंपळगाव २३ गाव पाणीपुरवठा योजना, १२ गाव वस्सा पाणीपुरवठा योजना, २० गाव पुरजळ पाणीपुरवठा योजना या प्रमुख योजनांसह येलदरी नदी काठावरील ३५ गावे, सिद्धेश्वर धरणाजवळील २० ते २५ गावे असे २०० पेक्षा जास्त गावांमध्ये परतीचा पाऊस पूर्ण क्षमतेने झाला नाही तर तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे़ विशेष म्हणजे, या दोन्ही धरण क्षेत्राखाली येणारी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यापासून वंचित राहणार आहे़
येलदरी धरणात उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी पिण्याच्या पाण्यासाठी साठा आरक्षित करून शिल्लक पाणी राहिल्यास सिंचनासाठी सोडता येईल़ यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल़