परभणी : पित्याचा खून करणाऱ्या आरोपी पुत्रास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:07 AM2018-05-15T00:07:51+5:302018-05-15T00:07:51+5:30
येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला असून, पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीस अटक केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : येथील बसस्थानकासमोरच चाकूचे सपासप वार करून जन्मदात्या पित्याचा खून केल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे काही काळ शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बंदोबस्तही वाढविला होता. घरगुती वादातून हा प्रकार घडला असून, पोलिसांनी रविवारी रात्री आरोपीस अटक केली आहे़
परभणी तालुक्यातील साडेगाव येथील नारायण सटवाजी नवघरे हे कुटुंबियांसह जिंतूर शहरात वास्तव्यास आहेत. १३ मे रोजी ते बसस्थानकासमोरील रस्त्यावरुन जात असताना त्यांना मुलगा राजू नवघरे हा त्या ठिकाणी आला व त्याने आपल्या पित्यावरच चाकूचे वार केले. त्यामुळे नारायण नवघरे (४५) हे जमिनीवर कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर राजू पसार झाला. नागरिकांनी धावपळ करीत जखमी अवस्थेतील नारायण नवघरे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी रात्री उशिरा मयताचा भाऊ भागोजी सटवाजी यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी राजू नवघरे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर रविवारी रात्रीच आरोपी राजू नवघरे याला पोलिसांनी साडेगाव येथून अटक केली.