परभणी : रस्ते दुरुस्तीसाठी सोनपेठकर पुन्हा उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:47 PM2019-02-25T23:47:27+5:302019-02-25T23:47:46+5:30
तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी २५ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसल्यानंतर तालुक्यातील रस्ते दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी २५ फेब्रुवारीपासून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले़
परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनपेठ तालुक्याला आरोग्य, शिक्षण व दळणवळणाच्या मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत़ त्यातच रस्त्याची अवस्था तर अत्यंत बिकट झालेली आहे़ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गतवर्षी सोनपेठकरांनी जवळपास महिनाभर आंदोलन केले होते. त्यानंतर रस्ते दुरुस्तीसाठी सोनपेठकरांना आश्वासन मिळाले़ आज ना उद्या हे रस्ते दुरुस्त होतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या सोनपेठ तालुकावासियांचा भ्रमनिरास झाला आहे़ त्यातच २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्याचा दौरा आटोपून नांदेडकडे निघाले होते़ वाटेतच सोनपेठ शहराजवळ त्यांची गाडी पंक्चर झाली़ त्यामुळे सोनपेठ तालुक्यातील खराब रस्त्यांचा फटका मुख्यमंत्र्यांनाही बसला़ या घटनेनंतर तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने सोनपेठ तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी सोमवारी पोलीस ठाण्यासमोरील परळी-पाथरी या राज्य रस्त्यावरील खड्ड्यात बसून नागरिकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन केले़ त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या़ त्यानंतर नायब तहसीलदार सय्यद सलीम, मंडळ अधिकारी शिवाजी कराड, ेदेवेंद्रसिंह चंदेल, पोलीस ठाण्याचे अनिल शिंदे, सुधाकर मुंडे यांनी आंदोलनस्थळी येऊन नागरिकांचे निवेदन स्वीकारले़ या निवेदनात मुख्यमंत्र्यांच्या टायरफुटीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करून ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील रस्ते दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे़ आंदोलनात सुधीर बिंदू, कृष्णा पिंगळे, रवींद्र देशमुख, राधेश्याम वर्मा, राजेश खेडकर, मंजूर मुल्ला, शिवमल्हार वाघे, भागवत पोपडे, अॅड़ दिलीप मोकाशे, बाळकृष्ण बहादूर, सुभाष वांगकर, विश्वंभर गोरवे, सोमनाथ नागुरे, अंगद काळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ
सोनपेठ तालुक्यातील सर्वच नागरिक रस्त्याच्या दुरवस्थेमुळे हैराण झाले आहेत़ त्यातच २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याने संतप्त झालेल्या सोनपेठकरांनी २५ फेब्रुवारी रोजी रस्त्यावर बसून आंदोलन केले़ या आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी तालुका प्रशासन आंदोलनस्थळी हजर झाले़ मात्र मूग गिळून गप्प बसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र आंदोलनस्थळी येणे उचित समजले नाही़