परभणी : स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:02 PM2020-03-22T23:02:30+5:302020-03-22T23:03:25+5:30
जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर रविवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच सेवाभावी संस्था, व्यापारी, अधिकारी या लढ्यात सहभागी झाले. त्यामुळे कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
परभणी शहरात पहाटेपासूनच जनजीवनाला प्रारंभ होतो. रविवारी ही सर्व कामे ठप्प ठेवण्यात आली. कृषी विद्यापीठ, राजगोपालाचारी उद्यान, जिल्हा स्टेडियम या भागात पहाटे देखील कोणी फिरकले नाही. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मात्र दुधविक्रेते, भाजी विक्रेते काही भागात दिसून आली. वृत्तपत्रही नियमितपणे वेळेवर नागरिकांच्या घरात पोहचले. यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनीही तेवढा वेळ देऊन त्यानंतरचा वेळ मात्र घरातच राहणे पसंद केले. त्यामुळे सकाळच्या सुमारास दिसणारी हलकीशी वर्दळ ९ वाजेनंतर मात्र थांबली. एरव्ही सकाळी १० वाजता बाजारपेठेत गजबज सुरु होते. मात्र रविवारी कुठेही ही गजबज पहावयास मिळाली नाही. गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, क्रांती चौक, स्टेशनरोड, स्टेडियम कॉम्लेक्स, शिवाजी कॉम्प्लेक्स, जनता मार्केट या भागातील दुकाने कडकडीत बंद होते. कुठलेही आवाहन न करता किंवा कुणाच्याही दबावाखाली न येता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात सहभाग नोंदविला.
येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि जिल्हा रुग्णालयातही प्रथमच शुकशुकाट पहावयास मिळाला. दिवसभरामध्ये परभणी बसस्थानकावरुन एकही बस बाहेरगावी धावली नाही. रेल्वे स्थानकावर मात्र सकाळच्या सुमारास चार रेल्वे दाखल झाल्या. त्यामध्ये रामेश्वर- ओखा, हैदराबाद- औरंगाबाद, पनवेल एक्सप्रेस आणि देवगिरी एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. मात्र या गाड्यांमधून बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी परभणी रेल्वेस्थानकावर उतरले. त्यानंतर मात्र दिवसभर रेल्वेस्थानक सुनसान पडले होते. जिल्हा रुग्णालयातही रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांची गर्दी गायब असल्याचे दिसून आले.
परभणी शहरासह ग्रामीण भागातही याच पद्धतीने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदविला. दिवसभरात एकाही शहरातून बसेस धावल्या नाहीत. बाजारपेठेमध्ये बंद पाळण्यात आला. त्यामुळे कोरोना या आजाराची धास्ती आता सर्वसामान्यांनी घेतली असून या आजाराविरुद्ध लढा यशस्वी करायचा असेल तर अलिप्त राहणे हा एकमेव उपाय आहे, याची जाण नागरिकांना झाली आहे. रविवारी हेच नागरिकांनी दाखवून दिले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरात सर्वच वसाहतींमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडून टाळ्या वाजवत तसेच थाळीनाद करीत कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये सहभाग नोंदविलेल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवसभर शहर शांत राहिले. या काळात पोलीस प्रशासनाने शहरामध्ये गस्त घालून आणि फिक्स पॉर्इंटवर बंदोबस्त लावला होता.