परभणी : विषाणूजन्य तापाचा वाढला फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:42 AM2018-10-03T00:42:42+5:302018-10-03T00:43:19+5:30
शहरात विषाणूजन्य तापाचा फैलाव वाढला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या संसर्गजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात विषाणूजन्य तापाचा फैलाव वाढला असून, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या संसर्गजन्य तापाची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे.
एक महिन्यापासून जिल्ह्यातील वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. वातावरण बदलाचा हा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. बालके आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार क्षमता कमी असते. परिणामी तापीची लागण होणाऱ्या रुग्णांमध्ये बालके आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. थंडी वाजणे, ताप येणे, सर्दी आणि खोकल्याने त्रस्त झालेले अनेक रुग्ण खाजगी आणि जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. विषाणूजन्य तापाबरोबरच डेंग्यूच्या तापाचाही फैलाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यू व डेंग्यूसदृश्य तापीने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्याही जिल्ह्यात अधिक आहे. तापीचा संसर्ग हा मुख्यत्वे डासांच्या माध्यमातून होतो. तर डेंग्यू तापाचा संसर्ग हा एडीस या डासापासून होतो. साचलेल्या पाण्यात तसेच स्वच्छ पाण्यात एडीस या डासाचे वास्तव्य असते. त्यामुळे नागरिकांनी जास्त दिवस पाणी साठवून ठेवू नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.
दरम्यान डेंग्यू तापाची साथ शहरात पसरल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. प्रत्येक कुटूंबात तापीची लागण झालेला रुग्ण आढळत आहे. तसेच अंग दुखणे, अंग जड पडणे अशी लक्षणेही आढळत आहेत. शहरात वाढत्या तापीच्या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.