परभणी : विषाणूजन्य तापाचा सेलू शहरात फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:42 AM2018-09-23T00:42:31+5:302018-09-23T00:43:11+5:30
वातावरणात अचानक बदल होत असल्याने विषाणूजन्य तापाने अनेक नागरिक फणफणले असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): वातावरणात अचानक बदल होत असल्याने विषाणूजन्य तापाने अनेक नागरिक फणफणले असून शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहेत. कधी थंड तर कधी उष्ण आणि ढगाळ दमट वातावरण होत असल्याने नागरिकांच्या प्रकृतीत बिघाड होत आहे. दमट वातावरणामुळे विषाणूंची वाढ होऊन ताप, सर्दी, खोकला, अंग दुखीने नागरिक हैराण झाले आहे. एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना विषाणूजन्य तापाची लागण होत आहे. परिणामी, अनेकांनी तापाच्या साथीची धास्ती घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयातही तापाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच या तापावर उपचार करण्यासाठी रक्त तपासणी केली जात आहे. त्यामुळे रक्त तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागत आहेत. ग्रामीण भागातही तापाचे रुग्ण वाढत आहेत. झपाट्याने पेशी कमी होण्याचे प्रमाण रुग्णांमध्ये आढळून येत आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. दरम्यान, ताप, सर्दी, खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत.