परभणी : माजलगावचे पोलीस पाथरीत तळ ठोकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:12 PM2018-02-20T23:12:19+5:302018-02-20T23:12:24+5:30
रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : रेशनचे २०० पोते धान्य माजलगाव पोलिसांनी पकडल्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजलगावचे पोलीस पाथरीत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. पोलिसांनी धान्याचे दस्ताऐवज ताब्यात घेतले आहेत. पाथरी येथील शासकीय गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान हा गायब असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.
लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरणाची नवी पद्धत दोन महिन्यांपासून अंमलात आणली जात आहे. शासनाच्या गोदामातून थेट रेशन दुकानदारापर्यंत माल पोहचविण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. तसेच स्वस्तधान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीनचा वापर सुरु झाला आहे. धान्य पोहचविणाºया वाहनांवर जीपीएस प्रणाली देखील बसविली आहे. एवढे सर्व असताना स्वस्तधान्य दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याचा प्रकार माजलगाव पोलिसांनी उघड केला. दोनशे पोते धान्य असलेला टेंपो १३ फेब्रुवारी रोजी पकडला होता. हा टेंपो पाथरी तालुक्यात धान्य वितरणासाठी वापरला जात होता.
माजलगाव पोलिसांनी पकडलेला टेंपो आणि त्यातील माल तपासण्यासाठी पाथरीच्या पुरवठा विभागातील नायब तहसीलदार निलेश पळसकर यांना माजलगाव येथे बोलावून मालाची सत्यता तपासण्यात आली. माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवत माजलगावचे पोलीस दोन दिवसांपासून पाथरीत तळ ठोकून आहेत. शासकीय गोदामातील धान्याची तपासणी सुरु आहे. दरम्यान, धान्य गोदामाचा गोदामपाल शेख इम्रान कोणतीही रजा न देता गायब झाल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे. या धान्य गोदामाचा अतिरिक्त पदभार बी.के.घनसावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.
शासकीय धान्य गोदाम आणि १४ स्वस्तधान्य दुकानदारांना वितरित केलेले धान्य याचा ताळमेळ जुळत असल्याचे सांगितले जात आहे. असे असेल तर पाथरी येथील टेंपोमध्ये पकडलेले धान्य आले कोठून असा सवाल उपस्थित होत आहे.माजलगाव पोलिसांच्या कारवाईनंतर पाथरी येथील पुरवठा विभागाने फेब्रुवारी महिन्यात वितरित केलेल्या १४ स्वस्तधान्य दुकानांची चौकशी केली. त्याचा अहवालही जिल्हा पुरवठा विभागाला पाठविला आहे, अशी माहिती तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी दिली.