परभणी : स्टेडियम परिसरात सुशोभिकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:14 AM2019-03-04T00:14:17+5:302019-03-04T00:14:30+5:30
येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम परिसरात उभारण्यात येणाऱ्या नियोजित म़ फुले पुतळा परिसरातील जागेवर महापालिकेने शनिवारपासून सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे़
स्टेडियम मैदान परिसरामध्ये महात्मा फुले यांचा पुतळा उभारला जाणार आहे़ या भागात सुरुवातीला चौरस्त्याच्या मध्यभागी पुतळ्याची जागा निश्चित करण्यात आली होती़ परंतु, या जागेत बदल करण्यात आला असून, याच परिसरातील मोकळ्या जागेमध्ये हा पुतळा उभारण्यात येणार आहे़ दोन महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पुतळ्याच्या कामाचे भूमीपूजनही पार पडले होते़ दरम्यान, महापालिकेने या ठिकाणी सुशोभिकरण करण्याचे काम हाती घेतले आहे़ या अंतर्गत शुक्रवारी सुशोभित करावयाच्या जागेची आखणी करून मार्कआऊट टाकण्यात आले़ रविवारी प्रत्यक्ष खोदकामाला सुरुवात झाली़
मनपा अंतर्गत कॉर्नर सुशोभिकरणाचे काम केले जाणार असून, फैय्याज कुरेशी यांना या कामाचे कंत्राट मिळाले आहे़ फेब्रुवारी महिन्यात मनपा प्रशासनाने कामाचे कार्यारंभ आदेश दिले असून, सहा महिन्यांच्या आत हे काम पूर्ण केले जाणार आहे़, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली़ दरम्यान, सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत़
३० लाख रुपयांचे काम
४जिल्हा स्टेडियम परिसरामध्ये ३० लाख रुपये खर्चून सुशोभिकरणाचे हे काम केले जाणार आहे़ त्यामध्ये छोटी संरक्षक भिंत उभारणे, लॉन टाकणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, ट्रॅक उभारणे, एक व्हॉल्व्ह आणि फाऊंटनचे काम केले जाणार आहे़ सहा महिन्यांची या कामासाठी मुदत असून, कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे़ विशेष म्हणजे या भागात महापालिकेने एक बोअर घेतला असून, या बोअरला भरपूर पाणीही लागले आहे़ त्यामुळे पुतळ्याच्या नियोजित भागात सुशोभिकरणासाठी पाण्याचा प्रश्नही निकाली निघाला आहे़