परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:04 AM2019-01-31T00:04:38+5:302019-01-31T00:05:13+5:30

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़

Parbhani: Start fodder camps in drought-hit areas | परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

परभणी : दुष्काळी भागात चारा छावण्या सुरू करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असून, या संदर्भात २५ जानेवारी रोजी अध्यादेश काढून आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत़
परभणी जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यातील ८४९ गावांपैकी सुमारे ७७२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून राज्य शासनाने जाहीर केली आहेत़ या गावांमध्ये चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत़ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर अधिग्रहण या कामांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या जिल्ह्यात सुरू झालेल्या नाहीत़ राज्य शासनाचे आदेश नसल्याने चारा छावण्यासंदर्भात प्रशासनाकडूनही उपाययोजना केल्या जात नव्हत्या़
दरम्यान, २५ जानेवारी रोजी महसूल व वन विभागाने अध्यादेश काढून चारा छावण्या सुरू करण्याबाबत सुचित केले आहे़ दुष्काळी भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करण्यासाठी आवश्यकतेनुसार चारा छावण्या उघडण्यास मंजुरी दिली आहे़ जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या आणि लहान पशूधन संख्येनुसार आणि चाºयाच्या उपलब्धतेनुसार आढावा घेऊन मंडळस्तरावर छावण्या सुरू कराव्यात, या छावण्यांमध्ये किमान ३०० ते ५०० जनावरे दाखल करून घ्यावीत़
प्रत्येक जनावरांच्या मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण जनावरांपैकी केवळ ५ जनावरे छावणीमध्ये दाखल करता येतील़ त्याच प्रमाणे सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, दुध खरेदीविक्री संघ या संस्थांमार्फतही चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात, असे या आदेशात म्हटले आहे़ छावणीत दाखल असलेल्या प्रती मोठ्या जनावरास प्रति दिन ७० रुपये आणि लहान जनावरास ३५ रुपये या प्रमाणे अनुदान दिले जाणार आहे़ चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांचे ऊन व आवकाळी पावसापासून संरक्षण होण्यासाठी निवारा उभारणे आवश्यक आह़े तसेच रात्रीच्या वेळी आवश्यक तो प्रकाश असावा, यासाठी अधिकृत विद्युत जोडणी, सौर यंत्रणेद्वारे पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी, जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे आदी अटीही घालण्यात आल्या आहेत़ चारा छावणीच्या आदेशामुळे जिल्ह्यातील पशूपालकांची चिंता दूर झाली आहे़
मोठी जनावरे : १५ किलो चारा लागणार
४चारा छावणी सुरू केल्यानंतर या छावणीमध्ये जनावरांना चारा देण्याचे निकषही शासनाने ठरवून दिले आहेत़ त्यानुसार मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन १५ किलो हिरवा चारा, उसाचे वाढे, ऊस आदी चारा द्यावा तर लहान जनावरांसाठी साडेसात किलो चारा देण्याचे निश्चित केले आहे़ तसेच आठवड्यातून तीन दिवस मोठ्या जनावरांना एक किलो तर लहान जनावरांना अर्धा किलो पशूखाद्य देता येईल़ तसेच सहा किलो वाळलेला चारा मोठ्या जनावरांसाठी आणि लहान जनावरांसाठी तीन किलो, मोठ्या जनावरांसाठी मूर घास आणि लहान जनावरांसाठी ४ किलो मूर घास देण्याची तरतूद या आदेशात करण्यात आली आहे़
६ लाख मे़ टन चारा
जल्हा प्रशासनाने मागील महिन्यात घेतलेल्या आढाव्यानुसार परभणी जिल्ह्यात ५ लाख ९० हजार ८०० मे़ टन चारा उपलब्ध होवू शकतो़ हा चारा २० जून पर्यंत पुरेल, असा अंदाज आहे़
एकमेव छावणी सुरू
जिल्ह्यात राणीसावरगाव येथे शासनस्तरावरून चारा छावणीला मंजुरी मिळाली असून, जिल्ह्यामध्ये एकमेव चारा छावणी सध्या सुरू आहे़ शासनाने शुक्रवारी काढलेल्या अध्यादेशामुळे येत्या काळात किती छावण्या सुरू होतात? याकडे लक्ष लागले आहे़

Web Title: Parbhani: Start fodder camps in drought-hit areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.