परभणी: नांदेड-औरंगाबाद डेमो रेल्वेगाडी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:10 PM2019-03-31T23:10:38+5:302019-03-31T23:11:20+5:30
नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेऊन डेमो रेल्वेगाडी सुरू करावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे़
नांदेड ते औरंगाबाद या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत़ या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये उभे राहून प्रवासी प्रवास करतात़ विशेष म्हणजे दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडे नांदेड विभागासाठी एक डेमो रेल्वे गाडी पडून आहे; परंतु, ही गाडी अद्याप सुरू होत नाही़ आंध्र प्रदेशमध्ये सद्यस्थितीत २२ ते २५ डेमो रेल्वे गाड्या चालविल्या जातात; परंतु, नांदेड विभागात केवळ एकमेव डेमो रेल्वे सुरू आहे़ नांदेड-औरंगाबाद, औरंगाबाद-अकोला, औरंगाबाद-उस्मानाबाद, अकोला-उस्मानाबाद या मार्गावर डेमो लोकल रेल्वेची मागणी असतानाही दक्षिण-मध्य रेल्वे विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे़ त्यामुळे मराठवाडा भागातील प्रवाशांना हक्काच्या सुविधेपासून वंचित ठेवले जात आहे़ तसेच दरवर्षी मुंबईला जोडून १५ ते २० नवीन गाड्या सुरू होत असताना नांदेड आणि अकोला येथून मुंबईसाठी नवीन गाड्या मिळत नाहीत़ तसेच उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन औरंगाबादमार्गे नांदेड, मुंबई, लातूर मुंबई, नांदेड-पुणे, नांदेड-बिकानेर, नांदेड-कटरा, औरंगाबाद-नागपूर, सोलापूर-नागपूर या नवीन विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे़ निवेदनावर प्रवासी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंडे, प्रा़ सुरेश नाईकवाडे, डॉ़ राजगोपाल कालानी, रितेश जैन, रविंद्र मुथा, दिलीपराव दुधाटे, डॉ़ अटल पुरुषोत्तम, कदीरलाला हाश्मी आदींची नावे आहेत़