परभणी : राज्यस्तरावरील चौकशी पथक परभणीत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:25 AM2018-11-03T00:25:37+5:302018-11-03T00:26:06+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ३ लाखांच्या आत कामांचे तुकडे पाडून मर्जीतील मजूर सोसायट्यांना कामे दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे वित्तीय सल्लागार गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय पथक शुक्रवारी परभणीत दाखल झाले़ या पथकाकडे विद्यार्थी संघटनेनेही तक्रार केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ३ लाखांच्या आत कामांचे तुकडे पाडून मर्जीतील मजूर सोसायट्यांना कामे दिल्याच्या प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे वित्तीय सल्लागार गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय पथक शुक्रवारी परभणीत दाखल झाले़ या पथकाकडे विद्यार्थी संघटनेनेही तक्रार केली आहे़
दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अधिस्विकृती तपासणी पथकाला खूष करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी शासनाचे आदेश झुगारून ३ लाखांच्या आत तुकडे पाडून ते मजूर सोसायट्यांना वाटल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता़ जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची ५३ कामे अशाच पद्धतीने केल्याची बाब समोर आली होती़ कृषी विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधान परिषदेची अधिस्विकृती मिळाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी होईल, असे अनेकांना वाटत होते; परंतु, कृषी विद्यापीठातील वरिष्ठांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला़ या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली़ त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणी कारवाईचे आदेश राज्याच्या कृषी विभागाला दिले होते़ त्यानुसार कृषी, पशूसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सहसचिव डी़ए़ गावडे यांच्या स्वाक्षरीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे पुणे येथील वित्तीय सल्लागार गणेश पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे आदेश काढण्यात आले होते़ त्यानुसार पाटील हे चौकशी करण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी सकाळी परभणीत दाखल झाले़ त्यानंतर त्यांनी कृषी विद्यापीठातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली़ त्यांच्याकडील दस्ताऐवज तपासले़ पाटील हे ३ नोव्हेंबर रोजीही या प्रकरणात चौकशी करणार आहेत़ दरम्यान, चौकशी अधिकारी पाटील यांची महाराष्ट्र कृषी पदवीधर आजी-माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाशसिंह शिसोदिया, सचिव अनिल आडे यांनी भेट घेतली़ त्यांना या संदर्भात मागण्यांचे निवेदन दिले़ त्यामध्ये कृषी विद्यापीठात कामाचे तुकडे पाडून अनियमितता करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ या प्रकरणी विद्यापीठातील नियंत्रक यांनी प्रभारी विद्यापीठ अभियंत्यांना कामांचे तुकडे पाडू नयेत, असा स्पष्ट अभिप्राय देऊनही कामाचे तुकडे पाडले गेले़ या संदर्भात कामे करीत असताना विविध वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना पाण्याची सोय, प्रसाधनगृहे, आवश्यक वाचन कक्ष, जेवणाच्या मेसची दुरुस्ती आदी कामे न करता केवळ रंगरंगोटी संबंधित कामांवर भर देऊन निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली़ त्यामुळे या कामाची गुणवत्ता नाशिकच्या मेरी येथील संस्थेकडून तपासणी करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे़ या प्रकरणी प्रभारी विद्यापीठ अभियंत्यांना निलंबित करून दोषींवर निधी अपहाराचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे अध्यक्ष सिसोदिया यांनी केली आहे़ यावेळी चौकशी अधिकारी पाटील यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले़