परभणी : उसाच्या दरासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:49 PM2018-11-11T23:49:28+5:302018-11-11T23:50:08+5:30
मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठवाड्यातील साखर कारखानदारांनी दर घोषित करून मागील वर्षीच्या उसाची थकबाकी आठ दिवसांत द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावरील त्रिधारा पाटी येथे रास्ता रोको आंदोलन केले़
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा़ राजू शेट्टी यांनी उसाच्या दरासाठी राज्यभरात आंदोलन पुकारले असून, या अंतर्गत परभणी येथे रविवारी आंदोलन करण्यात आले़ सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास त्रिधारा पाटी येथे शेतकरी जमा झाले होते़
२०१८-१९ मधील उसाचा पहिला हप्ता आणि २०१७-१८ मध्ये गाळप झालेल्या उसाच्या अंतीम बिलाबाबत हे आंदोलन करण्यात आले़ जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत २०१७-१८ या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या दराबाबत साखर कारखाना व शेतकरी नेते यांच्यात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने समझोता झाला होता़ त्यावेळी एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊस उत्पादकांना अदा करावी असे ठरले होते़ मात्र अद्यापपर्यंत ही रक्कम मिळाली नाही़ २०१८-१९ चा गळीत हंगामास पुरविल्या जाणाºया उसालाही एफआरपी अधिक २०० रुपये साखर कारखान्याने द्यावेत, साखर कारखान्यांना पैशांची उपलब्धता व्हावी, यासाठी साखरेचे दर वाढवू तसेच बँकेतून कर्ज उपलब्ध करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती़ याच धरतीवर मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी दर घोषित करून मागील वर्षीची थकबाकी द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले़
रस्ता रोको आंदोलनामुळे अर्धा ते पाऊण तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटींग, अमोल जवंजाळ, गंगाधर जवंजाळ, रामभाऊ आवरगंड, केशव आरमळ, शेख जाफर, मुंजाभाऊ लोंढे, दिगंबर पवार, बाळू पोते, गोविंद खटींग, सुधाकर खटींग, अजय खटींग, छत्रगुण खटींग, नामदेव खटींग आदींसह बहुसंख्य शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते़