परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:50 AM2018-11-20T00:50:46+5:302018-11-20T00:51:13+5:30
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी ): दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून इरळद, सावंगी, सोन्ना, गोगलगाव, मंगरूळ, नरळद, कोठाळा, टाकळी, पार्डी, शेवडी, राजूरा या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान वाटप करावे, पीक कर्जाचे पुनर्गठण करून तात्काळ कर्जाचे वाटप करावे इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात विलास बाबर, लिंबाजी कचरे पाटील, अशोक बुरखुंडे, संजय देशमुख, रामराजे महाडिक, बाबाराव आळणे, उद्धव निर्वळ, आनंद भक्ते, मुकुंद मगर, विष्णू जाधव, बाळासाहेब भिसे, सुभाष देशमुख, धनंजय तुरे, अशोक कचरे आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकूल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
मानवत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार अशा समस्यांना ग्रामस्थ तोंड देत असताना प्रशासनाकडून मात्र उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे किसान सभेने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केले.