परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी एक तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 11:55 PM2018-11-05T23:55:41+5:302018-11-05T23:56:55+5:30
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरिपाची पिके हातची गेली असून रबी हंगामात पेरणीच झाली नाही.
तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये सध्या मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी कालव्याला सोडल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचन व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटू शकतो. त्यामुळे दोन्ही कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसाठी दबाव गटाच्या वतीने सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथील रायगड कॉर्नर भागात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. कालव्याला पाणी सोडल्यास ज्वारीची पेरणी करता येईल, त्यातून चाºयाचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे प्रशासनाला सांगण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार आसाराम छडीदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर, अॅड. पी.ए. चव्हाण, ओमप्रकाश पौळ, विठ्ठल काळे, सोनू शेवाळे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, उदय पावडे, बाबा भाबट, पुंजाराम शेवाळे आदींसह दबाव गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे रायगड कॉर्नर भागातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
दबाव गटाने लावून धरली मागणी
सेलू तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दबाव गटाने उचलून धरला आहे. यापूर्वी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेलू तालुक्याचा दौरा केला होता. त्यावेळीही दबाव गटाने पाटील यांना निवेदन देऊन तालुक्यातील पाणीप्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर सोमवारी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी रेटून धरली.