परभणी : दुधनेच्या पाण्यासाठी रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:06 AM2019-05-12T00:06:06+5:302019-05-12T00:07:17+5:30
: निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शनिवारी मोरेगाव येथील नदीच्या पुलावर तब्बल दोन तास आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रातपाणी सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून शनिवारी मोरेगाव येथील नदीच्या पुलावर तब्बल दोन तास आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून दुधना प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे जालना जिल्ह्यातून या मागणीला विरोध केला जात असल्याने दुधनेचा पाणीप्रश्न पेटला आहे. याच पाणीप्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी रास्तारोको आंदोलन केले.
तालुक्यातील दुधना नदीकाठावरील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नदीकाठावरील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाºया विहिरी नदीपात्रात असून त्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी पाण्यासाठी भटकंती होत आहे. दुधना नदीचे पाणी पात्रात सोडल्यास पशूपक्षी व वन्य जीवांनाही पाणी उपलब्ध होईल. काही प्रमाणात हिरवा चारा निर्माण होईल. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
मोरेगाव येथील नदीपात्रावरील पुलावर केलेल्या आंदोलनामुळे देवगावफाटा ते पाथरी तसेच परभणी राज्य रस्त्यावरील वाहतूक आंदोलनामुळे खोळंबली होती. यावेळी जि.प.चे सभापती अशोक काकडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, सभापती पुरुषोत्तम पावडे, आनंद डोईफोडे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, अजय डासाळकर आदींसह मोरेगाव, साडेगाव, हातनूर, खुपसा, वाघ पिंपरी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाणी सोडेपर्यंत संघर्ष चालूच ठेवणार- काकडे