परभणी : सेलू परिसरात दमदार पाऊस; पिकांना मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:48 AM2019-07-20T00:48:02+5:302019-07-20T00:48:24+5:30
सेलूू शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे व नाले दुथडी भरुन वाहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : सेलूू शहर व परिसरात गुरुवारी मध्यरात्री १ वाजेनंतर तब्बल एक तास जोरदार पाऊस झाल्यामुळे या भागातील ओढे व नाले दुथडी भरुन वाहिले.
सेलू शहर व परिसरात मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पावसास सुरुवात झाली. जवळपास १ तास दमदार पाऊस झाला. त्यानंतरही पावसाची रिपरिप सुरुच होती. तालुक्यातील कुपटा, वालूर, चिकलठाणा भागातही दमदार पाऊस झाला. सेलू व देऊळगाव महसूल मंडळात साधारण पाऊस झाला. कुपटा परिसरात दमदार पाऊस झाल्याने परिसरात जलयुक्त शिवार योजनेतून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यात बºयापैकी पाणी साचले. या पावसाच्या पाण्यामुळे कुपटा ते कुपटा फाटा जोडणाºया रस्त्यावरील अरुंद पुलावरुन काही वेळ पाणी वाहत होते. यामुळे कुपटा गावाची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. येथील ओढ्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. मोरेगाव ते वालूर रस्त्यावरील हतनूर गावाजवळून वाहणारा ओढाही यंदा प्रथमच दुथडी भरुन वाहत होता. विशेष म्हणजे वालूर- कुपटा आणि चिकलाठाणा परिसरात पहिल्यांदाच दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, परभणी शहर व परिसरातही गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील रस्त्यावर सकाळच्या वेळी बºयापैकी पाणी साचले होते. यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला. असे असले तरी हा पाऊस सर्वदूर झाला नाही. परिणामी परभणी तालुक्यातील अनेक भागांमध्येही पावसाने हजेरी लावली नाही. परभणी तालुक्यात ६.५० मि.मी. पाऊस झाल्याची शुक्रवारी सकाळी महसूल विभागाकडे नोंद झाली.
जिल्हाभरात यंदा पावसाचे प्रमाण कमीच
४जिल्हाभरात आतापर्यंत एकही मोठा पाऊस झालेला नाही. असे असले तरी जिल्ह्यात सरासरी १२५.१२ मि.मी. पाऊस आतापर्यंत झाल्याची प्रशासनाकडे नोंद आहे.
४त्यामध्ये परभणी तालुक्यात ११३.६३ मि.मी., पालम तालुक्यात ९७.९९ मि.मी., पूर्णा तालुक्यात १३०.६० मि.मी., गंगाखेड तालुक्यात १३४.५० मि.मी., सोनपेठ तालुक्यात १४०.५० मि.मी., सेलू तालुक्यात ९९.४० मि.मी. पाथरी तालुक्यात ११४ मि.मी. जिंतूर तालुक्यात १३२.१६ मि.मी. आणि मानवत तालुक्यात १६३.३४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.