परभणी :कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:13 AM2020-02-06T01:13:13+5:302020-02-06T01:13:42+5:30
एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवीचा दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ५ फेब्रुवारीपासून विद्यापीठ परिसरात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे़
कृषी विद्यापीठांतर्गत एमएस्सी कृषी ही पदव्युत्तर पदवी २०१७ पर्यंत व्यावसायिक पदवी म्हणून गनली जात होती़ मात्र महाराष्ट्र शासनाने २०१९ मध्ये एक अध्यादेश काढून एमएस्सी कृषी पदवीचा व्यावसायिक दर्जा काढून हा अभ्यासक्रम अव्यावसायिक असल्याचा आदेश जारी केला़ त्यामुळे कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ विशेष म्हणजे याच अभ्यासक्रमाच्या बीएस्सी पदवी ही पदवी व्यावसायिक असून, पदव्युत्तर पदवी मात्र व्यावसायिक नसल्याचे आदेश काढण्यात आले आहेत़ या आदेशामुळे एमएस्सी कृषी अभ्यासक्रमाचे शुल्कही ८ हजारांवरून ३५ हजारांपर्यंत वाढले आहे़ याशिवाय व्यवसायाच्या अनुषंगाने अडचणींचाही सामना करावा लागत आहे़ त्यामुळे एमएस्सी कृषी या पदव्युत्तर पदवीला परत व्यावसायिक दर्जा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थी वर्षभरापासून राज्य शासनाकडे मागणी करीत आहेत़ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या प्रश्नी निवेदन देण्यात आले होते; परंतु, अद्याप या संदर्भात निर्णय झाला नाही़ त्यामुळे बुधवारी विद्यार्थ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे़ हे आंदोलन विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात नसून शासनाच्या विरोधात असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले़ या आंदोलनाच्या माध्यमातून कृषी पदव्युत्तर पदवीच्या व्यावसायिक दर्जा देण्याच्या मागणीबरोबरच पूर्वलक्ष प्रभावाने सर्व शिष्यवृत्त्यांचा लाभ द्यावा, पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता द्यावा इ. मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत़ त्याच प्रमाणे राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना आणि एकीकडे पिकांना योग्य भाव मिळत नसताना राज्य शासनाने मात्र विद्यापीठाच्या शुल्कांमध्ये दुप्पट वाढ केली आहे़ हे शुल्क कमी करावे, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे़ बुधवारी विद्यापीठ परिसरातून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलनाला सुरुवात केली़ या आंदोलनात कृषी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांचे ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत़
कुलगुरु विद्यार्थ्यांना भेटले
४विद्यार्थ्यांनी दुपारी १२ वाजता आंदोलन सुरू केल्यानंतर कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी सायंकाळी ६ वाजता आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांना त्यांच्या मागण्यांच्या अनुषंगने प्रशासनाकडून लेखी पत्र देण्यात आले़
४त्यामध्ये विद्यापीठ स्तरावरील मागण्या मान्य करण्यात येतील आणि राज्यस्तरावरील मागण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल तसेच कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक पदवी म्हणून मान्यता देण्याबाबत विद्यापीठाने शासनाला शिफारस केली असल्याचे त्यांनी सांगितले़ त्यानंतरही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच होते़