परभणी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आले तणावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:50 AM2018-12-15T00:50:12+5:302018-12-15T00:50:18+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी त्यांनाच मानसिक त्रास दिला जात असल्याने हे विद्यार्थी तणावात असल्याची तक्रार राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत सदरील विद्यार्थ्याने परीक्षेत नापास झाल्याच्या कारणावरुन आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली होती. असे असले तरी येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. कृषी महाविद्यालयातील काही प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी सातत्याने तणावात आहेत. विशेषत: वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जात आहे. महाविद्यालयात शैक्षिणक सहल, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. या संदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या बोलावून घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची धमकी दिली जाते. विद्यापीठ परिसरातील सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. बाहेरील व्यक्ती या परिसरात फोटोग्राफी करतात, त्यांच्यासोबत अवैध हत्यारे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भिती निर्माण होते. तसेच या बाहेरील व्यक्ती महाविद्यालय परिसरात जोराने वाहने चालवितात, स्टंटबाजी करतात, वाहने चालविण्याचे प्रशिक्षणही महाविद्यालयाच्या मैदानावरच सुरु असते. याबाबत विचारणा केल्यास विद्यार्थ्यांनाच दमदाटी केली जाते. यातून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खेळाच्या मैदानाचा गैरवापर केला जात असतानाही येथील वरिष्ठ केवळ बघ्याची भूमिका घेतात, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. बाहेरील व्यक्तींचा वावर येथे अधिक असल्याने विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनाही घडत आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनींनाच गप्प बसण्यास सांगितले जाते. अशाही तक्रारी आहेत.
प्राचार्यांची तकलादू भूमिका
४कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्यालयी राहत नाहीत. ते बाहेरगावाहून ये-जा करतात. त्यांच्याकडे विद्यार्थी तक्रारी करण्यासाठी गेल्यास त्याची दखल घेतली जात नाही. समूहाने विद्यार्थी गेल्यानंतर एका-एका विद्यार्थ्याला तक्रार करण्यास येण्यास सांगितले जाते. त्यानंतर एक-एक विद्यार्थी तक्रार करण्यास गेल्यास त्याला वैयक्तिकरित्या टार्गेट केले जाते, त्याची शैक्षणिक कामगिरी काय आहे ? त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक शुल्क अदा करायचे असल्यास त्यासाठी तगादा लावणे आदी प्रकार केले जातात. तसेच प्रात्याक्षिक परीक्षेत गुण कमी देण्याची धमकी दिली जाते, अशाही विद्यार्थ्याच्या तक्रारी आहेत. प्राचार्यांच्या तकलादू भूमिकेचा विद्यार्थ्यांना फटका बसत असल्याचेही या संदर्भात राज्य शासनाकडे तक्रार नमूद करण्यात आली आहे.
निकाल वेळेवर लागेनात
४कृषी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल वेळेवर लागत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील सत्राचे नियोजन करता येत नाही. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरु असताना विद्यापीठ प्रशासन मात्र या संदर्भात गांभीर्याने दखल घेत नाही, अशाही विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत.