परभणी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:42 PM2018-06-25T23:42:23+5:302018-06-25T23:43:16+5:30
शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने जिंतूर तालुक्यातील असोला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि त्यांचे पालक सोमवारी थेट प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात दाखल झाले़ शिक्षक द्या आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांनी शिक्षणाधिकाºयांकडे केली़
जिंतूर तालुक्यातील असोला येथे जिल्हा परिषदेची पहिली ते आठवीपर्यंत शाळा असून, या शाळेत १७० विद्यार्थी शिक्षण घेतात़ या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची ८ पदे मंजूर आहेत़ प्रत्यक्षात मात्र केवळ एक मुख्याध्यापक व शिक्षकच असे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत़ त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ चालू शैक्षणिक सत्रात शाळेला शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना होती; परंतु, ती फोल ठरली आहे़ शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ त्यामुळे २५ जून रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थी, पालकांनी असोला येथून थेट जिंतूर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठले़ मात्र या कार्यालयात गटशिक्षणाधिकारी उपस्थित नव्हते़ त्यामुळे ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचा हिरेमाड झाला़ त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट परभणी येथील जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग गाठला़
या विभागातील प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांच्या दालनात ठाण मांडून शिक्षकांची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी केली़ यावेळी मधुकरराव घुगे, संपत दरेकर, हरिभाऊ घुगे, तुकाराम घुगे, समाधान दरेकर, ज्ञानदेव दरेकर, बापूराव घुगे, सखाराम राठोड, बाळासाहेब नेवारे, बबन घुगे, अंकुश घुगे, रावसाहेब दराडे, पंढरी घुगे, शंकर घुगे,बालाजी घुगे, भगवान घुगे व विद्यार्थी सहभागी झाले होते़
दरम्यान, शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी या शाळेवर दोन शिक्षकांची तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती केली़ त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनी हे ठिय्या आंदोलन मागे घेतले़