परभणी : पुरवठा विभागाच्या गोदामाची पोलिसांकडून अचानक तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:10 AM2018-03-29T01:10:06+5:302018-03-30T11:21:44+5:30
अधिकार नसतानाही वागळे यांनी तपासणी केल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़
परभणी : पाथरी येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची २८ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनी अचानक तपासणी करून तेथील रजिस्टर ताब्यात घेतल्याने वाद निर्माण झाला असून, या प्रकरणी अधिकार नसतानाही वागळे यांनी तपासणी केल्याने तहसीलदार व नायब तहसीलदार अधिकारी संघटनेने त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़
सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे यांनी २८ मार्च रोजी सकाळी ११़३० च्या सुमारास पाथरी येथील पुरवठा विभागाच्या गोदामाची अचानक तपासणी केली़ त्यानंतर काही रजिस्टरही त्यांनी सोबत नेले़ त्यानंतर तहसीलदार पळसकर व गोदामपाल मस्के यांना पोलीस ठाण्याला बोलावून घेतले़ त्यामुळे गोदामातील धान्य वाटप बंद झाले़ ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश पिनाटे यांना तेथील कर्मचाºयांनी दिली़ त्यानंतर पिनाटे यांनी याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याशी चर्चा केली़ पानसरे यांनी याबाबत वागळे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी नायब तहसीलदार व गोदामपाल यांना ताब्यात घेतलेल्या रजिस्टरसह परत पाठवून दिले़ या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला़ या संदर्भात दुपारी ३़३० च्या सुमारास राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन वागळे यांच्या निलंबनाची मागणी केली़
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणतीही तक्रार नसताना किंवा वरिष्ठ अधिकाºयांची परवानगी न घेता वागळे यांनी ही तपासणी करून अभिलेखेही जप्त केले़ या प्रकारामुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा मलीन झाली आहे़ या प्रकरणी वागळे यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली़ तीन दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्ह्यातील गोदाम बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे़ निवेदनावर संघटनेचे विभागीय सरचिटणीस तहसीलदार विद्याचरण कडवकर, उपविभागीय अधिकारी सी़एस़ कोकणी, नायब तहसीलदार एस़डी़ मांडवगडे, अध्यक्ष जीवराज डापकर, एम़पी़ वाघुटे, वासूदेव शिंदे, तेजस्विनी जाधव, सुरेश शेजूळ, श्याम मदनूरकर आदींची नावे आहेत़ हे निवेदन देताना निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपविभागीय अधिकारी सुचिता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते़
शासकीय गोदाम असल्याची मला कल्पना नव्हती़ मला जी माहिती मिळाली होती, त्यानुसार मी गोदामाला भेट दिली़ त्या ठिकाणी नायब तहसीलदार उपस्थित होते व व्यवस्थित धान्य वाटप चालू होते़ कोणाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नाही़ कोणत्याही स्वरुपाची कारवाई मी केलेली नाही़
- रेणुका वागळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सेलू