परभणी ; किरकोळ आजारांसंदर्भात सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 10:42 PM2020-03-17T22:42:09+5:302020-03-17T22:42:46+5:30
किरकोळ आजारासंदर्भात ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्हाभर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली असून, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : किरकोळ आजारासंदर्भात ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून जिल्हाभर सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली असून, कोरोना संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली़
कोरोना संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, ग्रामीण भागात किरकोळ आजारासंदर्भात अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून घरोघरी सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे़ या सर्वेक्षणात सदरील कर्मचारी सर्दी, खोकला आदी आजाराची लागण झालेले किती ग्रामस्थ आहेत? परराज्यातून किंवा विदेशातून, कोणत्या शहरातून ग्रामस्थ आले आहेत? या संदर्भातील माहिती जमा करतील़ जेणे करून प्रशासनाला या संदर्भातील डाटा उपलब्ध होईल व त्या अनुषंगाने उपाययोजना करता येतील़ जिल्ह्यात सर्व शाळा, महाविद्यालये, निवासी वसतिगृह, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायाम शाळा, चित्रपटगृह आदी ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देवू नये, परवानगी दिली असेल तर ती रद्द करावेत, असे आदेश पोलिसांना दिले आहेत़ मास्क व सॅनिटायजर आदी वस्तुंची चढ्या दराने विक्री होवू नये, यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत़
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात ४० कोरेंटाईन बेड, १३५ आयसोलेशन बेड अशा एकूण १७५ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, खाजगी रुग्णालयांमध्ये ६० खाटांची व्यवस्था परभणी शहरात करण्यात आली आहे़ मंगळवारी सकाळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली़ त्यात त्यांना जाहीर कार्यक्रमात सहभागी होवू नका, अशी विनंती करण्यात आली आहे़ त्यांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसिाद दिला आहे़ याशिवाय सर्व धर्मगुरुंची बैठक घेण्यात आली़ त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शाहीनबागच्या आंदोलकांना गर्दी जमवू नये, या अनुषंगाने सूचना केली आहे़ त्यांनी त्यास प्रतिसाद दिला असून, बुधवारपासून येथे दररोज फक्त ५ जण आंदोलनासाठी बसणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून अनेक आदेश काढत असले तरी त्या आदेशाची अंमलबजावणी नागरिकांनी केली पाहिजे. यासाठी स्वत:हून त्यांनी बंधने पाळली पाहिजे़ सार्वजनिक ठिकाणी थुंकणे बंद केले पाहिजे़ खोकलताना तोंडासमोर रुमाल धरला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्कार करावा आदीं बाबींचे पालन होणे आवश्यक आहे़, असे ते म्हणाले.
जिल्ह्यात होम कोरेंटाईनमध्ये १४ रुग्ण
४जिल्ह्यात एकूण २३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यापैकी परभणीत ४, सेलू, पाथरीत प्रत्येकी ३, गंगाखेडमध्ये २, जिंतूर, मानवत प्रत्येकी १ अशा १४ रुग्णांवर होम कोरेंटाईनमध्ये उपचार सुरू आहेत तर परभणीतील ५, मानवतमधील ३ व हिंगोलीतील १ असे एकूण ९ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षामध्ये दाखल झाले़ जिल्ह्यातील १० रुग्णांच्या स्वॅबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते़ त्यापैकी ८ स्वॅबचा अहवाल आला असून, २ नमुने रिजेक्ट केले आहेत़ तर ६ रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत़
सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
४सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांच्या रजा, सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत़ मुख्यालय कोणीही सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत़ तालुका आरोग्य अधिकाºयांना सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक असलेला निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले़
१७ मार्च ते ३१ मार्चपर्यंत स्टेडियम बंद
कोरोना या संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये म्हणून शासनाच्या आदेशान्वये स्टेडियम खेळाडूंसाठी बंद करण्यात आले आहे. स्टेडियम परिसरातील ग्राऊंड, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्वीमींग, बॉक्सींग, स्टेटिंग, जिम्नॅस्टीक आदी खेळ खेळणाºया विद्यार्थ्यांना ३१ तारखेपर्यंत सुटी देण्यात आल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितले.