परभणी : निलंबित तलाठी महिनाभरातच पुन्हा रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:34 AM2018-11-17T00:34:49+5:302018-11-17T00:35:22+5:30
जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जास्तीची जमीन दाखवून एकाच व्यक्तीला दोनदा अनुदान वाटप करुन शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांना महिनाभरातच शासकीय पूर्नस्थापित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गंगाखेड उपविभागातील तलाठी निलंबन महिनाभरातच संपुष्टात आणल्याचा दुसरा प्रकार समोर आला आहे.
गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाअंतर्गत २०१७-१८ मधील कापूस बोंडअळी अनुदान वितरित करण्यात आले होते. या संदर्भातील सातबारांची मंडळ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. त्यामध्ये मसला येथील कौडाबाई राजाराम घोडके यांचे सर्वे नं.९७/०१ मधील क्षेत्र ०.५५ आर असून त्यांच्या नावे कापूस बोंडअळीचे अनुदान यादी क्रमांक ६३ मध्ये ०.७० आर दाखविले आहे. प्रत्यक्षात ०.१५ आर क्षेत्र जास्तीचे दाखविण्यात आले होते. उद्धव तुकाराम शिंदे यांची सर्वे क्रमांक ६७/अ/१ मध्ये १ हेक्टर १० आर आहे. तसेच सर्वे नं.६६/ब/१ मध्ये ०.४४ आर जमीन आहे. अशी एकूण शिंदे यांच्या नावावर १ हेक्टर ५४ आर जमीन आहे; परंतु, सदरील कापूस बोंडअळी अनुदान यादीमध्ये एकाच सर्वे नं.मध्ये डबल नाव टाकून ०.७० आर व १ हेक्टर ५० आर असे मिळून २ हेक्टर २० आर अनुदानाच्या यादीत नाव होते. म्हणजेच जमीन जास्तीची दाखवून एकाच व्यक्तीच्या नावावर दोनदा अनुदान दिले. सातबारापेक्षा जास्तीचे क्षेत्र दाखवून तलाठी आर.डी.भराड यांनी शासनाची दिशाभूल केली. याबद्दल त्यांना १५ सप्टेंबर रोजी निलंबित केले होते. त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी या संदर्भात गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांनी तलाठी भराड यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासकीय सेवेत पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. त्यांची पदस्थापना मालेवाडी सज्जा येथे करण्यात आली आहे. या संदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, तलाठी भराड यांनी कोणत्याही अमिषाला बळी न पडता बोंडअळीची यादी तयार केली आहे. त्या यादीमध्ये संगणकीय चूक झाल्यामुळे उद्धव तुकाराम शिंदे यांचे नाव डबल आल्यामुळे ०.४० आर शेत जमीन (प्रत्यक्ष अहवालात ७० आर जमिनीची नोंद आहे) नजर चुकीने वाढली आहे. तसेच कौडाबाई राजाराम घोडके यांचे देखील केवळ ०.१५ आर शेत जमिनीचे अनुदान नजर चुकीने जास्तीचे गेले आहे. दोन्ही खातेदारांकडून त्यांची वाढीव रक्कम देण्यास त्यांनी संमती दिली आहे. (रक्कम शासनाकडे परत भरली की नाही, याचा आदेशात उल्लेख नाही) या संदर्भातील अर्जदार कालिदास तुकाराम शिंदे यांनी उपोषणास बसू नये म्हणून धारकाने प्रयत्नशील राहिल, तरी त्यांची चुकभूल झालेली क्षमा करावी आणि भविष्यात अशा प्रकारची चूक होणार नाही. त्याची काळजी घेईल. त्यामुळे धारकांच्या (तलाठी भराड यांच्या) विनंती अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना शासकीय सेवेत पूर्नस्थापित करण्याबाबत विनंती केली आहे. गंगाखेड तहसीलदार यांनी तालुक्यात चार तलाठी सज्जे रिक्त असून एक तलाठी सध्या निलंबित आहे. त्यामुळे सदर गावचा अतिरिक्त पदभार दुसºया तलाठ्यांना न मिळाल्यामुळे अतिरिक्त सज्जावरील कामाचा बोजा येत असल्याने प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचणी येत आहे, असे निदर्शनास आणले आहे. त्यामुळे तलाठी भराड यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांना शासकीय सेवेत पुनर्स्थापित करण्यात येत असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गावंडे यांनी काढले आहेत.
मुलगीर यांच्यानंतर भराड पुन्हा सेवेत
४गंगाखेड उपविभागातील पालम तालुक्यातील फरकंडा सज्जाचे तलाठी सतीश ज्ञानोबा मुलगीर यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी २८ आॅगस्ट रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी २८ सप्टेंबर रोजी सेवेत पुनर्स्थापित करण्याचा विनंती अर्ज उपविभागीय अधिकाºयांकडे दिला. त्याच दिवशी त्यांचे निलंबन संपुष्टात आणण्याचा आदेश काढण्यात आला. त्यानंतर आता गंगाखेड तालुक्यातील नरळद सज्जाचे तलाठी आर.डी.भराड यांचे निलंबन संपुष्टात आणल्याचा निर्णय महिनाभरातच घेण्यात आला आहे. भराड यांना १५ सप्टेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. १ आॅक्टोबर रोजी सेवेत पुनर्स्थापित करण्याचा अर्ज त्यांनी दिला. १५ आॅक्टोबर रोजी महिनाभरातच त्यांचे निलंबन संपुष्टात आणून सेवेत पुनर्स्थापित करण्यात आले.
चौकशी निर्णयाधीन राहून आदेश
४तलाठी भराड यांच्याविरुद्ध प्रस्तावित असलेल्या विभागीय चौकशीतील अंतिम निर्णयाच्या आधीन राहून त्यांना शासकीय सेवेत पूर्नस्थापित करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी गावंडे यांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे भराड यांच्या पूर्नसेवेचा मार्ग मोकळा झाला.