परभणी : खोट्या गुन्ह्याचे प्रकरण गांभिर्याने घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:58 AM2018-03-27T00:58:37+5:302018-03-27T00:58:37+5:30
पेपरफुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्यावरुन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवरच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केल्या प्रकरणी शासनाने गंभीर दखल घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावरुन शासनाला दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पेपरफुटल्याची बातमी प्रसिद्ध केल्यावरुन वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवरच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केल्या प्रकरणी शासनाने गंभीर दखल घेण्याचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्यावरुन शासनाला दिले आहेत.
परभणी जिल्ह्यात १४ मार्च रोजी दहावीचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग १ विषयाचा पेपर व्हॉटस्अॅपवर व्हायरल झाला होता. या संदर्भात शाहनिशा करुन ‘लोकमत’ व अन्य एका वृत्तपत्राने १५ मार्चच्या अंकात संबंधित वृत्त प्रसिद्ध केले होते. या प्रकरणी शिक्षण विभागातील अधिकाºयांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन शाहनिशा न करता वृत्त प्रकाशित केले व शिक्षणाधिकारी कार्यालयास माहिती दिली नाही म्हणून नवा मोंढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात २२ मार्च रोजी विधानसभेत आ.डॉ.राहुल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर २६ मार्च रोजी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे यांनीही औचित्याचा मुद्दा दुपारच्या सत्रात उपस्थित केला. यावेळी आ.धनंजय मुंडे म्हणाले की, दहावी, बारावीच्या परीक्षेत पेपरफुटीच्या घटना राज्यभर घडत आहेत. रोज राज्यातील कुठल्या न कुठल्या गावात पेपर फुटल्याच्या बातम्या येत आहेत. शिक्षण विभागातील अधिकाºयांच्या निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या सहभागातूनच अशा घटना घडत आहेत. अशा अधिकाºयांविरुद्ध सरकारने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परभणी जिल्ह्यात मात्र वेगळाच प्रकार पहावयास मिळाला. दहावीच्या विद्यार्थ्याचा पेपर फुटल्याची बातमी का प्रसिद्ध केली, म्हणून लोकमत व अन्य एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीविरुद्धच गुन्हा दाखल करण्याची अजब कामगिरी शिक्षण विभाग आणि पोलिसांनी केली. परभणी जिल्ह्यात १ मार्च २०१८ पासून सातत्याने पेपर फुटत आहेत. शिक्षण विभागाला ही बाब माहीत असतानाही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी चोर सोडून संन्यासाला फाशी असा प्रकार होत आहे. पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा, प्रसार माध्यमांवर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. परभणी जिल्ह्यातील पेपर फुटीच्या प्रकरणात दोन पोलीस कर्मचारीच आरोपी आहेत. शिक्षण विभागातील अधिकाºयांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी पत्रकारांचीच गळचेपी करण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करणाºया उपशिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आ.धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी सरकारने गंभीर दखल घ्यावी, असे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत.
प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न
मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनांतर्गत विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन विरोधी पक्षनेते आ.धनंजय मुंडे म्हणाले की, पत्रकारांवर गुन्हे दाखल करणे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा हा प्रकार असून प्रसारमाध्यमांवर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सभापतींनी याची गंभीर दखल घेऊन सरकारला कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात बोलताना केली.
प्रसारमाध्यमांवर दबाव टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सभापतींनी याची गंभीर दखल घेऊन सरकारला कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही विनंती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात बोलताना केली.