परभणी : शिक्षकांनी पं.स.त मांडले ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:31 AM2018-09-22T00:31:14+5:302018-09-22T00:31:55+5:30
वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेतनाच्या विलंबामुळे मुलांच्या शैक्षणिक खर्चाबरोबरच गृहकर्ज व इतर कर्जाचे हप्ते फेडताना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.
त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गंगाखेड पं.स. कार्यालय गाठून पंचायत समितीच्या प्रांगणातच ठिय्या मांडला. जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेला अदा करण्यात आले. त्यानंतर आॅगस्ट महिन्याचे वेतन केव्हा होईल, याची शाश्वती नसल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत होता. वेतन होण्यास विलंब लागत असून या विलंबाची कारणे शोधून अडचणी दूर कराव्यात, शिक्षकांना वेळेवर वेतन अदा करावे, अशी मागणी करण्यात आली.
शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी स्वीकारले. शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्ना संदर्भात संबंधितांना त्वरित सूचना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिक्षक पतपेढीचे चेअरमन हरिश्चंद्र भोसले, रावसाहेब कातकडे, विठ्ठल चामे, गजानन लोळे, डी.एस. मुंडे, माणिकराव जाधव, माधव मुंडे, श्रीराम चिमले, माणिकराव नागरगोजे, कोंडिबा पवार, मधुकर जाधव आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.