परभणी : पं़स़ कार्यालयात शिक्षकांनी मांडले ठाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:58 AM2019-01-24T00:58:25+5:302019-01-24T00:59:00+5:30
शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये सुमारे ४५० शिक्षक कार्यरत आहेत़ या शिक्षकांचे वेतन पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागातून होते़ मुख्याध्यापकांच्या खात्यावर वेतन जमा होते़ त्यानंतर प्रत्येक शिक्षकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाते़ मात्र पंचायत समितीच्या लेखा विभागातील संबंधित कर्मचारी प्रत्येक महिन्यामध्ये विविध कारणे दाखवून वेतन देण्यास विलंब करीत आहे़ डिसेंबर २०१८ चे वेतन बायोमॅट्रिक प्रणालीच्या नावाखाली अद्यापही करण्यात आले नाही, असा आरोप शिक्षकांनी केला़ त्याच प्रमाणे शिक्षकांच्या अपघात विम्याची रक्कम एप्रिल २०१८ मध्येच कपात केली़ मात्र अजूनही ही रक्कम शासनाच्या खात्यावर जमा केली नाही, असे शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ पंचायत समिती कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी यांच्या कारभारावर या शिक्षकांनी रोष व्यक्त केला़
शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्यामध्ये निश्चित तारखेलाच बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी करीत बुधवारी रात्री ८़३० वाजेपर्यंत या शिक्षकांनी पंचायत समितीच्या कार्यालयात ठाण मांडले़ रात्री ८़३० वाजेच्या सुमारास पं़स़ सभापती पुरुषोत्तम पावडे, पं़स़त दाखल झाले़ त्यांनी शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतले़ रात्री उशिरापर्यंत शिक्षकांसमवेत बैठक सुरू होती़ तोडगा मात्र निघाला नव्हता़