परभणी : दुष्काळी यादीत आणखी दहा मंडळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:12 AM2018-11-06T00:12:39+5:302018-11-06T00:13:06+5:30
जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी २४ मंडळांमध्ये यापूर्वीच गंभीरस्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला असून, पाऊस आणि एकंदर परिस्थितीचा विचार करता आणखी दहा मंडळांमध्ये दुष्काळी परिस्थिती नाजूक झाल्याने या मंडळांचाही गंभीर दुष्काळाच्या यादीत समावेश करावा, असा विनंतीवजा अहवाल जिल्हा प्रशसनाने शासनाकडे पाठविला असून या दहा पैकी सात मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
यंदा परतीचा पाऊस झाला नसल्याने जिल्हाभरात परिस्थिती गंभीर झाली आहे. प्रकल्पांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. याशिवाय रबी पेरण्या झाल्या नाहीत आणि खरीप हंगामातही नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत होती. राज्य शासनाने यावर्षी दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलले आहेत.
या निकषानुसार पहिल्या टप्प्यात पावसाच्या सरासरीवर आधारित जिल्ह्यातील चार तालुके गंभीर दुष्काळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग केल्यानंतर जाहीर केलेल्या गंभीर दुष्काळाच्या यादीत सहा तालुक्यांचा समावेश झाला. मात्र गंगाखेड, पूर्णा आणि जिंतूर या तालुक्यांचा समावेश झाला नाही.
राज्य शासनाने तालुकानिहाय पावसाचाच विचार करुन दुष्काळी तालुक्याची यादी जाहीर केली. त्यात तीन तालुक्यांचा समावेश झाला नाही. मात्र मंडळ निहाय विचार करता दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यातील अनेक मंडळांमध्येही गंभीर स्वरुपाची परिस्थिती आहे. या मंडळांमध्येही कमी पाऊस झाला असून, पिकांचे उत्पादनही झाले नाही. त्यामुळे मंडळांचा विचार करता आणखी दहा मंडळे दुष्काळी यादीत समाविष्ट होणे अपेक्षित आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या सहा तालुक्यातील २४ मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश आहे. मात्र, उर्वरित तीन तालुक्यांपैकी गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून, या मंडळांचाही दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करावा, असा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे. त्यामुळे आता या मंडळांविषयी काय निर्णय होतो, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
जिंतूर, गंगाखेडमध्ये परिस्थिती नाजूकच
४जिंतूर अणि गंगाखेड या तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पिकांची वाढ व्यवस्थित झाली नसल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांप्रमाणेच या दोन्ही तालुक्यातील परिस्थिती असून, दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात पाऊस कमी झाल्याने व जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने रबी ज्वारी व इतर पिकांची कमी प्रमाणात पेरणी झाली अूसन, येणाºया काळात चाºयाची कमतरता भासू शकते. या शिवाय या दोन्ही तालुक्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तेव्हा गंगाखेड व जिंतूर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची कार्यवाही करावी, अशी विनंती जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.
या मंडळांचा पाठविला अहवाल
४गंगाखेड आणि जिंतूर तालुक्यातील दहा मंडळांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठविल आहे. त्यानुसार गंगाखेड मंडळात ७८.५ टक्के, राणीसावरगाव मंडळात ५०.३६, माखणी ५३़२३, महातपुरी ५९़२५, जिंतूर ६९़६१, सावंगी म्हाळसा ८३़७१, बोरी ५५़४४, चारठाणा ४७़६८, आडगाव ३८़४४ आणि बामणी मंडळात ७९़०९ टक्के पाऊस झाला आहे़ तेव्हा या मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, असा अहवाल पाठविण्यात आला आहे़ या दहा मंडळांपैकी गंगाखेड, सावंगी म्हाळसा आणि बामणी या तीन मंडळांतील पावसाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने हे मंडळ वगळता उर्वरित ७ मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर होवू शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे़