परभणी : मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निघाल्या निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:42 AM2019-06-26T00:42:39+5:302019-06-26T00:43:12+5:30
जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील वाकलेले विद्युत खांब, जीर्ण झालेल्या विद्युत तारा, अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्तीच्या निविदा काढल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज पुरवठ्याच्या मोबदल्यात ग्राहकांकडून वीज बिल वसूल केले जाते; परंतु, महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा बहुतांश ठिकाणी जुनाट व मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये थोडासा वारा किंवा पाऊस झाला तर ग्रामीण भागातील वीज पुरवठा १२-१२ तास खंडित होतो. परिणामी वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्याच बरोबर वीज वितरण कंपनीच्या कारभाराविरुद्ध ओरडही होते. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने मान्सूनपूर्व वीज कामांच्या दुरुस्तीसाठी यावर्षी पहिल्यांदाच तीन वर्षाच्या मुदतीतील निविदा काढल्या आहेत. त्यामुळे आता या निविदाधारकांना जिल्ह्यातील तीन वर्षे मान्सूनपूर्व वीज दुरुस्ती करुन वीज वितरण कंपनीला केलेल्या कामाचे फोटो व बिघाडाचे फोटो पाठवावे लागणार आहेत. त्यानंतर या कंपनीकडून संबंधित ठेकेदाराला बिले अदा केली जाणार आहेत.
वीज ग्राहकांना देणार प्राधान्य
४जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या सेवेसाठीच वीज वितरण कंपनीची निर्मिती झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांनी आलेल्या अडचणी निसंकोचपणे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगून सोडून घ्याव्यात. जेणेकरुन वीज ग्राहकांची गैरसोय होणार नाही. पावसाळ्यामध्ये वीज ग्राहकांना येणाºया अडचणी सोडविल्या जाणार आहेत, अशी माहिती अधीक्षक अभियंता बनसोड यांनी दिली.