परभणी : वाळू घाट खरेदीकडे कंत्राटदारांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:18 AM2019-04-11T00:18:24+5:302019-04-11T00:18:45+5:30
जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १३ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया तीन वेळा केल्यानंतरही हे वाळूघाट खरेदी करण्यासाठी कंत्राटदार फिरकले नसल्याने लिलाव रखडला आहे़ त्यामुळे या घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़
यावर्षी जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडले होते़ हरित लवादाची परवानगी न मिळाल्याने ही प्रक्रिया ठप्प होती़ फेब्रुवारी महिन्यात राज्य हरित समितीने हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३३ वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली़ विशेष म्हणजे त्यातील केवळ ११ वाळू घाट कंत्राटदारांनी खरेदी केले असून, उर्वरित वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ लिलावाच्या पहिल्या प्रक्रियेत खरेदी न झालेल्या वाळू घाटांसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु, तीनही वेळा वाळू घाटांच्या खरेदीसाठी कंत्राटदार फिरकले नाहीत़ त्यामुळे जिल्ह्यातील वाळू घाटांची प्रक्रिया रखडली आहे़ सद्यस्थितीत निर्माण झालेली वाळुची टंचाई लक्षात घेता हे वाळू घाट लिलावाद्वारे वाळू उपस्यासाठी खुले होणे आवश्यक आहे़ शासनाच्या नियमानुसार तीनपेक्षा अधिक वेळा लिलाव प्रक्रिया केल्यानंतरही विक्री होत नसेल तर त्या घाटांची किंमत कमी करण्याची तरतूद आहे़ या तरतुदीनुसार १३ वाळूघाटांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविले असून, तेराही वाळू घाटांची किंमत २५ टक्क्यांनी कमी केल्यास या घाटांचे लिलाव होण्याची शक्यता आहे़, असे नमूद केले असून, घाटांची किंमत कमी करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़
गोदावरी, दूधना, पूर्णा या तीन नद्यांवरील वाळू घाटांचे लिलाव करून त्या ठिकाणावरून वाळुचा अधिकृत उपसा केला जातो़ या वर्षात केवळ ११ घाटांचेच लिलाव झाले आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाला आर्थिक फटका तर सहन करावा लागतच आहे़ या शिवाय सामान्य नागरिकांना वाळू उपलब्ध होत नाही़ जास्तीत जास्त वाळू घाट खुले झाले तर वाळुची किंमत कमी होऊन बांधकाम व्यावसाय वाढीस लागू शकतो़ या सर्व पार्श्वभूमीवर १३ वाळू घाटांचे फेरलिलाव होण्याची शक्यता आहे़
गोदावरी नदीवरील: १२ घाट
परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या वाळुला मागणी आहे़ मात्र याच नदीच्या पात्रावरील वाळू घाटांचा लिलाव अद्याप झाला नाही़ सर्वाधिक घाट गोदावरी नदीवर असून, या घाटांच्या लिलावासाठी २५ टक्के रक्कम कमी करण्याची विनंती आयुक्तांकडे करण्यात आली आहे़ या वाळू घाटांमध्ये पिंपळगाव सारंगी, पेनूर-१, पेनूर-२, कळगाव, बाणेगाव, खरबडा-२, पिंप्री झोला, महातपुरी, भांबरवाडी, खडका, लिंबा, थार आणि दूधना नदीकाठावरील सोन्ना येथील वाळू घाटांचा समावेश आहे़ या वाळू घाटांची मूळ किंमत कमी करून हे घाट पुन्हा लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करावेत, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे केली आहे़
४या वाळू घाटांमध्ये सुमारे ७४ हजार ३८२ ब्रास वाळू उपलब्ध आहे़ त्यात गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला वाळू घाटात सर्वाधिक १० हजार ६०१ ब्रास वाळू उपलब्ध असून, पेनूर-१, पेनूर-२ येथे प्रत्येकी ८ हजार ४८१, कळगाव येथे ८ हजार ६५७, महातपुरी घाटात ८ हजार ४८१, पिंपळगाव सारंगी घाटात ६ हजार ८०२, भांबरवाडी घाटात ३ हजार १८०, लिंबा घाटात ५ हजार ३०० तर सोन्ना येथील घाटामध्ये ३ हजार ८७० ब्रास वाळू उपलब्ध आहे़
जिल्ह्यातील वाळू घाटांच्या किंमती लाखांमध्ये असून, यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काही परिस्थितीचा परिणामही लिलावावर झाला आहे़ त्याच प्रमाणे लिलावानंतर साधारण: २ ते ३ महिनेच वाळुचा उपसा करावा लागणार आहे़ त्यामुळे वाळू उपस्यातून फारसा फायदा होण्याची श्क्यता नसल्याने कंत्राटदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली आहे़