परभणी: चोरीची फिर्याद निघाली खोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:21 PM2019-03-17T23:21:59+5:302019-03-17T23:22:33+5:30
शेळ्या चोरीच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद खोटी निघाल्याचा प्रकार १५ मार्च रोजी उघडकीस आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): शेळ्या चोरीच्या प्रकरणात पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्याद खोटी निघाल्याचा प्रकार १५ मार्च रोजी उघडकीस आला आहे़
एम.एच. ४० एके ४०७३ या टेम्पोचा चालक समद गुलमोहम्मद खान पठाण यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ त्यानुसार वालूर येथून मो़ हनिफ कुरेशी यांच्या १२१ शेळ्या आंध्र प्रदेशातील मंचर येथे घेऊन जात असताना झिरो फाटा रस्त्यावर ३ मोटारसायकलस्वारांनी चाकूचा धाक दाखवून वाहन थांबविले व ६५ हजार रुपये किंमतीच्या १३ शेळ्या चोरून नेल्या, असे तक्रारीत म्हटले होते़
पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार विनोद रत्ने, मिलिंद कांबळे यांनी या प्रकरणाची चौकशी केली़ तक्रारदाराची तपासणी करीत असताना काही बाबी पोलिसांना संशयास्पद वाटू लागल्या़ त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादीची उलट तपासणी घेतली तेव्हा धक्कादायक बाब पुढे आली़ समद खान पठाण याने सोमवारी टेम्पो चालविण्यासाठी गेलोच नव्हतो, असे पोलिसांना सांगितले़ मालकानेच मला खोटी तक्रार द्यायला लावली, अशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे़ मालकाने खोटी तक्रार का देण्यास सांगितली, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे, अशी माहिती फौजदार चंद्रकांत पवार यांनी दिली़