परभणी : तालुक्यातील गावे नाहीत म्हणून तोडला वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:23 PM2018-10-10T23:23:34+5:302018-10-10T23:24:12+5:30
तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तुमची गावे आमच्या तालुक्यात नाहीत़ त्यामुळे तुमच्या तालुक्यातून वीज जोडणी घ्या, असे म्हणत सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्याने गंगाखेड तालुक्यातील पाच गावांचा वीज पुरवठाच खंडीत केल्याचा धक्कादायक प्रकार ९ आॅक्टोबर रोजी घडला़
गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा, शेंडगा, उखळी खु़, मानकादेवी व श्रीक्षेत्र हरंगुळ या पाच गावांतील ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी व कृषीपंपासाठी सोनपेठ तालुक्यातून वीज पुरवठा केला जातो़ वीज वापरापोटी ग्रामस्थ गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात बिल भरत असतात़
९ आॅक्टोबर रोजी सकाळी सोनपेठ येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कांबळे यांनी करम (ता़ सोनपेठ) येथील ३३ केव्ही या उपकेंद्रातून वरील पाच गावांना होणाऱ्या वीज पुरवठ्याची वीज जोडणी तोडली़ मंगळवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरू झाला नसल्याने याबाबत पाच गावांतील ग्रामस्थांनी या भागातील लाईनमनकडे विजेसंबंधी चौकशी केली़ तेव्हा लाईनमन सांगितले की, सोनपेठ येथून तुमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यावरून ग्रामस्थांनी १० आॅक्टोबर रोजी गंगाखेड येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून ग्रामीण विभाग- २ चे सहाय्यक अभियंता पराग डोेण यांची भेट घेतली़ खंडीत केलेला वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली़ त्यावरून अभियंता डोणे यांनी सोनपेठ येथील उपकार्यकारी अभियंता कांबळे यांच्याकडे वीज जोडणीची मागणी नोंदविली; परंतु, अभियंत्यांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यास नकार दिला़ त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली व वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली़ तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर धनगर मोहा येथील सरपंच सारिका खांडेकर, आत्माराम मांगदरे, रमेश खांडेकर, बाळासाहेब गायकवाड, दादासाहेब खांडेकर, रविकुमार घुले, सुनील खांडेकर, अय्युब पठाण, दिगंबर व्होरगीळ, धनंजय फड, मनोहर खांडेकर, राजेभाऊ नरवाडे, धोंडीबा व्होरगीळ, खाजा खान पठाण, भागवत फड, चंद्रहंस तिडके, रघुनाथ हाके, देविदास गायकवाड, ज्ञानोबा व्होरगीळ, आत्माराम तरडे, शेख वहाब, ईश्वर आंधळे आदीं ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत़
पाच गावांतील : पाणीपुरवठ्यावर परिणाम
तालुक्यात गावे नसल्यामुळे खंडीत करण्यात आलेला पाच गावांतील वीज पुरवठा बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू करण्यात आला नव्हता़ त्यामुळे गंगाखेड तालुक्यातील धनगरमोहा, शेंडगा, उखळी खु़, मानका देवी, श्रीक्षेत्र हरंगुळ या गावातील पाणीपुरवठ्यासह दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून गंगाखेड तालुक्यातील ही पाच गावे सोनपेठ तालुक्यातील करम येथील ३३ केव्ही उपकेंद्राला जोडलेली आहेत़ त्यांना तेथून नियमित वीज पुरवठाही करण्यात येत होता़ परंतु, अचानक उपकार्यकारी अभियंत्यांच्या या कारवाईमुळे पाच गावांतील ग्रामस्थ हैराण झाले आहेत़ कोणतीही पूर्वसूचना न देता सरळ वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईमुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत़