परभणी : भरतीसाठी ३५ ते ४० हजार युवक येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:55 AM2019-12-18T00:55:32+5:302019-12-18T00:56:29+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या भारतीय सैन्य दलातील भरती मेळाव्यासाठी राज्यातील ९ जिल्ह्यांतून सुमारे ३५ ते ४० हजार उमेदवार परभणीत दाखल होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
४ ते १३ जानेवारी या काळात सैनिक जनरल ड्युटी, टेक्निकल व ट्रेडसमन या पदांसाठी ही भरती होणार आहे. या सैन्य भरतीसाठी सध्या आॅनलाईन नोंदणी सुरू असून, १९ डिसेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख आहे. परभणीसह राज्यातील ९ जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असून, प्रत्येक जिल्ह्यातून साधारणत: ४ ते ५ हजार उमेदवार परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे ९ दिवस ही भरती प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपºयातून येणाºया युवकांची गैरसोय होऊ नये, या दृष्टीने परभणी जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना या प्रक्रियेसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हद्दीतील मैदान आणि विविध वसतिगृह भरती प्रक्रियेसाठी वापरले जाणार आहेत. जिल्ह्यात एकाच वेळी मोठ्या संख्येने युवक परभणीत दाखल होणार असून या युवकांची कृषी विद्यापीठातील वसतिगृहात तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यापीठ परिसरात स्वच्छतेची कामे केली जाणार आहेत. अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने महानगरपालिकेला दिल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाला या ठिकाणी मैदान आखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या काळात आवश्यक असलेल्या पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर दिली आहे. तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यलयांनाही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली जबाबदारी देण्यात आली आहे.
एकंदर या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, उमेदवारांची संख्या लक्षात घेता, आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. याच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला आहे. एकंदर सैन्य भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाºया हजारो उमेदवारांना परभणीतील भरती मेळावा एक चांगली संधी घेऊन आला असल्याने हजारोंच्या संख्येने उमेदवार परभणीत दाखल होतील, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष : रेल्वे सोडण्याची विनंती
४परभणी येथे ४ ते १३ जानेवारी या काळात भारतीय सैन्य भरती मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर ३ ते १३ जानेवारी या कालावधीत दररोज सुमारे ४ ते ५ हजार उमेदवार परभणीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. या उमेदवारांची वाहतुकीची सुविधा व्हावी, यासाठी मनमाड ते धर्माबाद दरम्यान ३ ते १३ जानेवारी या काळात दररोज विशेष रेल्वेची व्यवस्था करावी.
४ही रेल्वे दररोज सकाळी ६ वाजता परभणी येथे पोहोचेल आणि १२.३० वाजता परभणीतून सुटेल, अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करुन द्यावी. तसेच नांदेड ते मनमाड मार्गावरुन धावणाºया नियमित रेल्वे गाड्यांना या कालावधीत २ जनरल डबे वाढविण्याची विनंती जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील विभागीय प्रबंधकांकडे केली आहे.
या जिल्ह्यांसाठी आहे भरती
४परभणी येथे होत असलेली सैन्य भरती परभणी जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी असून १९ डिसेंबर ही या भरती प्रक्रियेसाठी आॅनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे.
परभणी जिल्ह्यात होत असलेल्या सैन्य भरती मेळाव्यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येणाºया सर्व संबंधित शासकीय कार्यालयातील प्रमुखांना भरती प्रक्रियेसंदर्भात आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
-अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी