परभणी : ‘चार वर्षात एकही ग्रामसभा नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:07 AM2019-01-24T01:07:26+5:302019-01-24T01:07:48+5:30
सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवगावफाटा (परभणी): सेलू तालुक्यातील गिरगाव ग्रामपंचायतीने चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामधून प्राप्त झालेला निधी, यातून प्रत्यक्षात विकासकामावर केलेला खर्च आणि सध्याच्या स्थितीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
गिरगाव खु. येथील ग्रामपंचायतीला चार वर्षे पूर्ण होऊन सुद्धा आतापर्यंत गावात कोणतीही विकासकामे करण्यात आलेली नाहीत.
शासनाच्या वतीने गावाच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना व चौदाव्या वित्त आयोगामार्फत मिळालेल्या निधीतून गावात सुरू करण्यात आलेला सिमेंट रस्ता, नालीचे काम, अंगणवाडी साहित्य खरेदी तसेच अंगणवाडीकरीता गॅस, इनव्हर्टर खरेदी व पाणीपुरवठा दुरूस्ती या कोणत्याही सुविधा न राबविता त्या फक्त कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखविण्यात येत आहे.
चार वर्षाच्या कालावधीत एकदाही ग्रामसभा झाली नसल्यामुळे आज गावाला चौदाव्या वित्त आयोगामार्फत एकूण किती निधी प्राप्त झाला व प्रत्यक्षात कोणत्या कामावर तो किती खर्च झाला आहे, या सर्व बाबींची मात्र अजूनही काहीच माहिती येथील ग्रामस्थांना नाही. त्यामुळे चार वर्षाच्या कालावधीत न झालेल्या विकास कामांची व चौदाव्या वित्त आयोगातील निधीची त्वरीत चौकशी करून कारवाई करावी कारवाई करावी, अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य अनिता संतोष झिंबरे, मिराबाई मुरलीधर पनकुटे, संदिपान आसाराम केंद्रे यांच्या स्वाक्षºया आहेत.