परभणी : मसला गावाला टंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:15 AM2019-05-15T00:15:07+5:302019-05-15T00:15:38+5:30
गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.
गंगाखेड तालुक्यात यावर्र्षी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणीसाठा शिल्लक नाही आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्रातूून वाळू मोठ्या प्रमाणात उपसा केली जात असल्याने पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
एकेकाळी सुजलाम, सुफलाम असलेल्या गोदावरी काठावरील गावांमध्ये यावर्षी मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन फिरण्याची वेळ ओढावली आहे. तालुक्यातील मसला या गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने टंचाई वाढली आहे. विहिरी, हातपंपाला पाणी शिल्लक नाही. नळ योजना बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जनावरांची पाण्यासाठी भटकंती
च्मसला गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोदावरी पात्र कोरडे पडल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तेव्हा जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी नदीपात्रात खड्डे करण्यास (झरे करण्यास) परवानगी द्यावी, अशी मागणी मसला येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.
च्सोमवारी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली. त्यांना गावातील पाण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी रामकिशन शिंदे, विनायक शिंदे, बाबासाहेब शिंदे, राजेभाऊ कदम, निवृत्ती शिंदे, अर्जून शिंदे, विशाल कदम, भागवत शिंदे, अरूण शिंदे, उद्धव शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, केशव भूजबळ आदी उपस्थित होते.
१८ हातपंप पडले कोरडेठाक
च्मसला गावातील मारोती मंदिर, गोकुळ गल्ली, नगर गल्ली, मुख्य रस्ता, जिल्हा परिषद शाळा आणि जुन्या गावातील सुमारे १८ हातपंप आणि विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. काही हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.
च्मागील सहा महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. परिसरात पाणीसाठा शिल्लक नसून, प्रशासनानेच आता पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.