परभणी : ‘अभद्र’ युतीवर आघाडीची चुप्पी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:32 AM2019-03-05T00:32:41+5:302019-03-05T00:33:19+5:30
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चार ते पाच दिवसांमध्ये लागण्याची शक्यता असली तरी जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने समविचारी पक्षांना डावलून केलेली ‘अभद्र’ युती कायम असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ९ मार्चच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा राज्यपातळीवर सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना - भाजपाची युती झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिवसेना किंवा भाजपा पक्षासोबत केलेली युती तोडावी, असे आदेश आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार ही ‘अभद्र’ युती असल्याने ती तोडली जाईल, असेही सांगण्यात आले होते; परंतु, जिल्हा पातळीवर तशा प्रकारच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत. परभणी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने कॉंग्रेसला बाजूला ठेवून भाजपाला सत्तेत भागिदार बनविले. तर परभणी पंचायत समितीमध्ये कॉंग्रेसने चक्क देशपातळीवर एक नंबरचा राजकीय शत्रू असलेल्या भाजपासोबत युती करुन शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अभद्र युती केली आहे. ही अभद्र युती तोडण्यासंदर्भात जिल्ह्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांना राज्य पातळीवरुन कोणताही निरोप मिळाला नसल्याचे समजते. त्यामुळे जवळपास दोन वर्षापासून या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अभद्र युतीचा संसार गुण्या-गोविंदाने सुरु आहे. आता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार असली तरी युती तोडलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या व्यासपीठावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपावर टीका करताना स्थानिक पातळीवर केलेली तडजोड जिल्ह्यातील कार्यकर्ते कसे विसरतील, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही सभांमधून भाजपाचा भाषणामधून खरपूस समाचार घेतला आहे; परंतु, स्थानिक पातळीवरील अभद्र युतीसंदर्भात त्यांनीही चकार शब्द काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेसचे कार्यकर्ते गोंधळले आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी परभणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थामधील अभद्र युती संपुष्टात येते की देश व राज्य पातळीवर वैचारिक मतभेद कायम ठेवून, स्थानिक पातळीवर तडजोड कायम ठेवली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.