परभणी : पाठलाग करून चोरास पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:38 PM2019-08-17T23:38:31+5:302019-08-17T23:39:04+5:30
येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): येथील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे यांच्या घरातून १५ आॅगस्ट रोजी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याचे दागिने व रोख २ लाख १५ हजार रुपये आणि समोर असलेली महिंद्रा कंपनीची गाडी घेऊन चोराने धुम ठोकली. सदरील चोरट्याचा पाठलाग करून नागरिकांनी त्याला नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात पकडले.
पालम नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बालासाहेब गणेशराव रोकडे हे १५ आॅगस्ट सकाळी ७ वाजता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते. दररोज वापरातील चारचाकी गाडी घरी सोडून ते शहरात दुचाकीने भेटी गाठी घेत होते. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास त्यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुलूप तोडून एका चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याच्या अंगठ्या व नगदी दोन लाख १५ हजार रुपये आणि घरासमोरील महिंद्रा एक्स.यु.व्ही. एम.एच २२ /ए.टी. ७७७६ क्रमांकाची गाडी घेऊन सदरील चोरटा नांदेडकडे निघून गेला. दरम्यान, उपनगराध्यक्ष रोकडे हे घरी आले असताना घराचा दरवाजा उघडा दिसला व समोर गाडीही नव्हती. त्यामुळे त्यांनी लोहा, नांदेड ,अहमदपूर, परभणी, गंगाखेड येथील मित्रांना फोन करून गाडी चोरी झाल्याची माहिती दिली.
नागरिकांनी तातडीने नांदेड मार्गे गाडी जात असल्याचे त्यांना फोनवर कळविले. त्यानंतर नागरिकांनी नांदेड जवळील विष्णुपुरी परिसरात ही गाडी अडविली. त्यावेळी आरोपीने चाकूचा धाक दाखवून गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी मोठा जमाव जमून चोरास पकडले. त्यानंतर तातडीने पोलिसांशी संपर्क करून आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत बालासाहेब रोकडे यांच्या फियार्दीवरून आरोपी ज्ञानेश्वर बालाजी जाधव (रा. आष्टूर, ता. लोहा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.