परभणी : सेलू ते पाथरी पायी महादिंडीत हजारो भाविकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:40 PM2020-02-09T23:40:52+5:302020-02-09T23:41:21+5:30
पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थान असल्याने पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी साईबाबा यांचे सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सेलू येथून ९ फेब्रुवारी रोजी सेलू ते पाथरी अशी २६ कि.मी. अंतराची पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सेलू शहरासह तालुक्यातून सुमारे १२ हजार भाविक सहभागी झाले होते. साई जन्मभूमीसाठी सेलूकरांनी ही दिंडी काढून लढा सुरु ठेवण्याचा निर्र्धार व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): पाथरी हेच साईबाबा यांचे जन्मस्थान असल्याने पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी साईबाबा यांचे सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांची कर्मभूमी असलेल्या सेलू येथून ९ फेब्रुवारी रोजी सेलू ते पाथरी अशी २६ कि.मी. अंतराची पायी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत सेलू शहरासह तालुक्यातून सुमारे १२ हजार भाविक सहभागी झाले होते. साई जन्मभूमीसाठी सेलूकरांनी ही दिंडी काढून लढा सुरु ठेवण्याचा निर्र्धार व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पाथरी येथील साई जन्मस्थळाच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर शिर्डीकरांनी जन्मस्थळाला विरोध केल्याने हा वाद अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पाथरीकरांनी २९ पुरावे सादर करुन आपला दावा मजबूत केला आहे. आता साईबाबा यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सेलू शहरातूनही पाथरीकरांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी सेलू ते पाथरी पायी महादिंडी काढण्यात आली. दिंडी मार्गावर कुंडी पाटी, गुगळी धामणगाव या ठिकाणी भाविकांसाठी चहा, पाणी व नाश्त्याची सुविधा केली होती.
सिमूरगव्हाण येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात दुपारी १२ वाजता ही दिंडी पोहचली. आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ, जि.प.चे माजी सभापती अशोक काकडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. भोजनानंतर महादिंडी पाथरीकडे रवाना झाली. दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांनी साईराम लिहिलेल्या टोप्या, भगवे ध्वज, गळ्यात रुमाल घातला होता. त्यामुळे अवघे वातावरण साईमय झाले होते. अग्रभागी साईबाबा यांची भव्य मूर्ती असलेला रथ, अश्व, टाळकरी आणि ओम साई रामचा जयघोष करीत महादिंडीत सहभागी झालेले भाविक उत्साहपूर्ण वातावरणात पाथरीकडे मार्गस्थ झाले. या महादिंडीत सुमारे १२ हजार भाविकांचा समावेश होता.
पाथरीत महादिंडीचे स्वागत
४दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही महादिंडी पाथरी येथील साई मंदिरात दाखल झाली. संत सार्इंचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. पाथरीकरांनी जागोजागी रांगोळ्या काढून दिंडीचे स्वागत केले.
४यावेळी आ.बाबाजानी दुर्राणी व पाथरी साई संस्थानच्या वतीने महादिंडीत सहभागी झालेल्या आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, नगराध्यक्षा विनोद बोराडे, बाजार समितीचे सभापती दिनकर वाघ यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रेरणाताई वरपूडकर, जि.प.च्या माजी उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर दिंडीचा समारोप झाला.
पुराव्यांचा चित्ररथ
४साई जन्मभूमी पाथरी व सद्गुरु स्थान सेलू येथील २९ पुराव्यांचा चित्ररुपी देखावा दिंडीत सादर करण्यात आला. त्याचप्रमाणे १५० तोफांची सलामीही देण्यात आली. त्यामुळे वातावरण साईमय झाले होते.
साईधाम नामकरण करा -मेघना बोर्डीकर
४पाथरी ही साईबाबा यांची जन्मभूमी असून सेलू येथील सद्गुरु केशवराज बाबासाहेब महाराज साईबाबांचे गुरु आहेत. मात्र शिर्डीकरांनी वाद निर्माण केला. जगभरातील साईभक्तांसमोर सत्य सांगण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. पाथरी ही साई जन्मभूमी असल्याने या गावाचे नाव साईधाम असे करावे, अशी आपली मागणी आहे, असे आ.मेघना बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.