परभणी :हजारोंच्या जनसागराने दिला गौतमदादांना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:51 PM2019-03-28T23:51:40+5:302019-03-28T23:51:51+5:30
गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गेल्या ४२ वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविणारे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अॅड़ गौतमदादा भालेराव यांना गुरुवारी साश्रू नयनांनी हजारोंच्या जनसमुदायाने अखेरचा निरोप दिला़
गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष तथा पेठशिवणी येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सहकारी सूतगिरणीचे चेअरमन अॅड़ गौतमदादा भालेराव यांचे २७ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले होते़ त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या होत्या़ रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले गौतमदादा हजरजबाबी व अभ्यासपूर्ण भाषणासाठी परिचित होते़ त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील हजारो हितचिंतक गंगाखेड येथे दाखल झाले़ दुपारी ३ वाजता आंबेडकर नगर येथील सम्राट निवास येथून सजविलेल्या ट्रकमध्ये अॅड़ गौतमदादा भालेराव यांची अंत्ययात्रा काढण्यात आली़ दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास शहरातील दत्तमंदिर परिसरात असलेल्या पी़जी़ भालेराव अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पूर्णा येथील भंते उपगुप्त महाथेरो यांनी बुद्धवंदना घेतल्यानंतर अॅड़ गौतमदादा यांचे चिरंजीव बुद्धप्रिय भालेराव यांनी त्यांना अग्निडाग दिला़ यावेळी आ़ प्रा़ जोगेंद्र कवाडे, प्रा़ कमलताई गवई, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सुरेशराव वरपूडकर, खा़ बंडू जाधव, आ़ बाबाजानी दुर्राणी, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ डॉ़ राहुल पाटील, माजी खा़ सुरेश जाधव, अॅड़ गणेश दुधगावकर, माजी आ़ ज्ञानोबा गायकवाड, सुरेश देशमुख, विजय गव्हाणे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे सचिव राजकुमार सागर, साखर आयुक्त बी़ वाय़ गायकवाड, पोलीस अधीक्षक भारत तांगडे, पोलीस अधीक्षक सागर, माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, लक्ष्मणराव गोळेगावकर, रविकांत चौधरी, संतोष मुरकुटे, विशाल कदम, रामप्रभू मुंडे, दिलीपराव देशमुख, धम्मानंद मुंडे, विजय वाकोडे, बाबूराव पोटभरे, गणपत भिसे, मेघना बोर्डीकर, अशोक उफाडे, विजयकुमार शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी बळीराज लांजिले, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आदींची उपस्थिती होती़ यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पाठविलेला शोक संदेश वाचून दाखविण्यात आला़ यावेळी आंबेडकरी चळवळीतील मराठवाड्याचा सुपुत्र काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या़ फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणारे नेतृत्व व आपल्या शेरोशायरीने सर्वांना मंत्रमुग्ध करणारा आंबेडकरी चळवळीतील ढाण्या वाघ गमावल्याची शोकभावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली़
गंगाखेड शहरातील बाजारपेठ बंद
अॅड़ गौतमदादा भालेराव यांच्या निधनानंतर गुरुवारी गंगाखेड शहरातील बाजारपेठ व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली़ दिवसभर शहरातील बाजारपेठ बंद होती़ अॅड़ गौतमदादा यांच्या पार्थिवावर दुपारी ४़३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सायंकाळी ५ वाजेनंतर काही व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली होती़ अॅड़ गौतमदादा यांना व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली़