परभणी : कान्हेगाव येथे तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:22 AM2019-12-30T00:22:22+5:302019-12-30T00:23:40+5:30
अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदार पल्लवी टेमकर, तलाठी दीपक तुपसमुद्रे व त्यांचे सहकारी तालुक्यातील कान्हेगाव शिवारातील नदी घाटावर अवैैध वाळू उपसा थांबविण्यासाठी कारवाई करण्यास गेले होते. यावेळी पथकाला पाहताच वाळू उपसा करणारे आरोपी फरार झाले. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचारी आरोपींचा पाठलाग करीत असताना त्यातील एका आरोपीने तलाठी दीपक तुपसमुद्रे यांना दगड हातात घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी दीपक तुपसमुद्रे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी आनंद पंडितराव मोरे याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शेळ्या चारण्यावरुन दाम्पत्यास मारहाण
४गंगाखेड- शेळ्या चारण्याच्या कारणावरुन २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना घडली असून दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पूर्णा तालुक्यातील वझूर येथील विजयमाला बाबुराव कचरे (४५) यांनी २८ डिसेंबर रोजी लक्ष्मण पवार यांच्या शेतात शेळ्या चारल्या. दरम्यान, २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास संतोष मुंजाजी पवार, सतीश मुंजाजी पवार यांनी विजयमाला कचरे यांना शेतात शेळ्या चारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. तसेच सतीश पवार याने बाबुराव कचरे यांना मारहाणही केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांनाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विजयमाला कचरे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. जमादार हरिभाऊ शिंदे तपास करीत आहेत.