परभणी : तीन वेगवेगळ्या घटनांत महिलेसह तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:21 AM2019-07-17T00:21:24+5:302019-07-17T00:22:16+5:30
शहरासह तालुक्यातील आडगाव आणि बामणी येथे झालेल्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या घटना घडल्या असून पोलिसांनी तीनही घटनांची नोंद घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): शहरासह तालुक्यातील आडगाव आणि बामणी येथे झालेल्या तीन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. १५ जुलै रोजी या घटना घडल्या असून पोलिसांनी तीनही घटनांची नोंद घेतली आहे.
शहरातील औंढा रोडवरील औद्योगिक वसाहतीमध्ये १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास संदीप विक्रमसिंग सेंधव (३०) हा ट्रकच्या टपावरील दोरी काढण्यासाठी वर चढला असता त्याला विजेच्या तारांचा स्पर्श झाला. या घटनेत संदीप सेंधव याचा जागीच मृत्यू झाला.
याच दिवशी रात्री १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आडगाव येथे वैजनाथ हिवाळे यांची मुलगी मीनाक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वैजनाथ हिवाळे यांनी जिंतूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मीनाक्षी हिचे लग्न १९ मार्च २०१७ रोजी आडगाव येथील प्रमोद दाभाडे याच्यासोबत झाले होते. घरातील कामास कंठाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे माहिती वैजनाथ हिवाळे यांनी दिली. त्यावरुन जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
पाण्यात बुडून गुराख्याचा मृत्यू
४नदीपात्रात बुडून एका गुराख्याचा मृत्यू झाल्याची घटना १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बामणी परिसरात घडली. बामणी येथील प्रल्हाद सुदाम वाकळे (३८) हे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गुरे चारण्यासाठी गेले होते.
४येलदरी तलाव परिसरात एक म्हैस ओढ्याच्या पलीकडच्या दिशेने जात असल्याने प्रल्हाद वाकळे हे पाण्यात उतरले. यावेळी या पाण्यामध्ये कोणीतरी मासे पकडण्याचे जाळे टाकले होते. या जाळ्यात अडकून प्रल्हाद वाकळे यांचा मृत्यू झाला. शिवाजी वाकळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मयत प्रल्हाद वाकळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.