परभणी : आणखी तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:46 AM2018-10-20T00:46:14+5:302018-10-20T00:46:45+5:30
शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील रमाबाईनगरात एका युवकाचा तलवारीचे वार करुन खून केल्या प्रकरणात पोलिसांनी १८ आॅक्टोबर रोजी आणखी तीन आरोपींना परभणीतून अटक केली असून आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक आरोपी फरार आहे.
परभणी शहरातील रमाबाईनगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरुन शेख सोहेल शेख आहत, शेख सोहेल याचा मित्र शेख मोहसीन व शेख लुकमान या तिघांवर तलवारीने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये शेख सोहेल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे मित्र शेख मोहसीन व शेख लुकमान हे जखमी झाले होते. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शेख मोहसीन याने फिर्याद दिली होती. त्यानंतर शेख हाजी शेख सलीम, शेख मोहम्मद शेख अहेमद, शेख समी शेख सलीम, शेख शोएब शेख तैमूर, शेख तैमूर शेख जिलानी व शेख सद्दाम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी शेख हाजी शेख सलीम, शेख मोहम्मद शेख अहेमद या दोघांना अटक केली होती. त्यानंतर गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शेख समी, शेख शोएब, शेख तैमूर या तिघांना परभणी येथून अटक केली. त्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणातील शेख सद्दाम हा एक आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि.सुनील गिरी करीत आहेत.
पोलिसांचे दुर्लक्ष चर्चेचा विषय
४या प्रकरणात मयत युवक शेख सोहेल व शेख शोएब शेख तैमूर यांच्यात गल्लीत मोटारसायकल वेगाने चालविण्याच्या कारणावरुन १६ आॅक्टोबर रोजी वाद झाला होता. त्यानंतर शेख सोहेल याने कोतवाली पोलीस ठाण्यात जावून या प्रकरणी तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जावर कोतवाली पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. शिवाय या वादाचे गांभीर्यही लक्षात घेतले नाही. या तक्रार अर्जाची आरोपींना कुणकुण लागली. त्यातूनच मयतावर दुसऱ्या दिवशी तलवारीने हल्ला करण्यात आला असल्याचे समजते.