परभणी : आज जि.प. अध्यक्षपदाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:39 AM2020-01-07T00:39:09+5:302020-01-07T00:39:37+5:30
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठी ७ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याकडे लक्ष लागले आहे़
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्याने नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे़ त्यानुसार ७ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी डॉ़ सुचिता शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा होणार आहे़ सभेपूर्वी दोन तास अगोदर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभेच्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत़ त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे़ जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे़ बहुमतासाठी २८ सदस्यांची आवश्यकता असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ सदस्य आहेत़ त्याचप्रमाणे शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपचे ५, घनदाट मित्रमंडळ १, रापस ३ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे़ येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे़ एकंदर परिस्थिती पाहता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित आहे़ मात्र अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याची मात्र उत्सुकता लागली आहे़
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेतील सर्व पक्षीय सदस्यांची बैठक रविवारी पाथरी येथे घेतली़ या बैठकीला जि़प़तील ५४ सदस्यांपैकी ५२ सदस्य उपस्थित होते़ या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांबाबत चर्चा झाली; परंतु, अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावावर एकमत झाले हे मात्र अधिकृतरित्या समजू शकले नाही़ असे असले राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाताई विटेकर यांच्या नावाची चर्चा आहे़ तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे़