परभणीत व्यापाऱ्यांचा बंद
By admin | Published: January 27, 2017 02:33 PM2017-01-27T14:33:00+5:302017-01-27T14:33:00+5:30
महानगरपालिकेने एलबीटी कराची वसुली करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे काम थांबवण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी बंदचं हत्यार उपसले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 27 - शहर महानगरपालिकेने एलबीटी कराची वसुली करण्यासाठी नियुक्त केलेल्या एजन्सीचे काम थांबवण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी 26 जानेवारीपासून सुरु केलेले बंदचे आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम आहे. शुक्रवारी मनपाच्या कारभाराविरोधात शहरातील शिवाजी चौकात व्यापाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
परभणी शहरातील एलबीटीची वसुली करण्यासाठी महानगरपालिकेने मुंबई येथील एजन्सीची नियुक्ती केली होती. ऑगस्ट २०१५मध्ये शासनाने एलटबी रद्द केली असली तरी तत्पूर्वीची थकबाकी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आहे. ही थकबाकी वसूल करण्याचे काम मनपाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत सुरु आहे.
महानगरपालिकेच्या २ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नियुक्त केलेल्या एजन्सीचा कार्यकाळ संपल्याने पूर्वीच्या एजन्सीचे काम थांबवून नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा निर्णय झाला. परंतु, या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. जुन्या एजन्सीकडून व्यापाऱ्यांना थकबाकी वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
एजन्सीच्या या कामाला शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई येथील एजन्सीचे कामकाज त्वरित थांबविण्यात यावे व महापालिकेद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्याकडून किंवा स्थानिक कर सल्लागारामार्फत योग्य त्या पद्धतीने एलबीटीची थकबाकी वसूल करण्याच्या मागणीसाठी २६ जानेवारीपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना व्यापाऱ्यांनी निवेदन दिले. त्यानंतर २७ जानेवारी रोजी शहराची मुख्य बाजारपेठ बंद आहे. व्यापाऱ्यांनी शहरातील शिवाजी चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहे.