परभणी : वाहतूक पोलीस गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:57 AM2017-12-02T00:57:40+5:302017-12-02T00:58:03+5:30
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक व पार्किंगच्या समस्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना ही वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी असलेले या शाखेचे पोलीस कर्मचारी ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणाहून गायब असल्याची स्थिती शुक्रवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आली. पाहणी केलेल्या १८ पैकी चारच ठिकाणी वाहतूक पोलीस दिसून आले.
शहरातील बाजारपेठ भागासह बसस्थानक, रेल्वेस्थानक, नारायणचाळ आदी भागात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होत आहे. शहरातील रस्ते जुने असून एकेरी वाहतुकीचे हे रस्ते आहेत. या रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक होते. शिवाय वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेलाच वाहने उभी केली जातात. परिणामी शहरातील रस्त्यांवरुन वाहने चालविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. शहरातील नारायण चाळ परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली. चारही बाजुंच्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका अडकून पडल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. तब्बल २० मिनिटे रुग्णवाहिका वाहनाच्या गराड्यात अडकून पडली. त्यानंतर काही नागरिक व वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी ही वाहतूक सुरळीत करुन रुग्णवाहिकेला रस्ता उपलब्ध करुन दिला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ‘लोकमत’ने दोन पथकांमार्फत शहरातील वर्दळीच्या १८ ठिकाणची पाहणी केली. परंतु, या पाहणीमध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, बसस्थानक, शिवाजी चौक या चारच ठिकाणी वाहतूक पोलीस आढळून आले. शहरातील वसमतरोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात दुपारी १२.४८ वाजता भेट दिली तेव्हा एकही वाहतूक पोलीस कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे चारही बाजुंनी येणारे वाहनधारक आपल्या सोयीनुसार मार्ग काढत वाहन चालविताना दिसून आले. १२.५८ वाजता विद्यापीठ गेट समोरील काळी कमान परिसरात भेट दिली असता तेथेही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. तर वाहनधारक आपल्या सोयीनुसार वळण घेत होत होते. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी दिसून आली. १.०५ वाजेच्या सुमारास खानापूर फाटा येथे भेट दिली असता या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी दिसला नाही.
दुसºया पथकाने दुपारी १ वाजता शिवाजी चौकात पाहणी केली असता वाहतूक शाखेचे एक पुरुष व एक महिला कर्मचारी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर कारवाई करताना दिसून आले. त्यानंतर १.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व १.१६ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या परिसरात भेट दिली तेव्हा या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी आढळून आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात मागील काही दिवसांपासून चांगलीच वाहनांची वर्दळ होत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी तरी वाहतूक शाखेचे कर्मचारी असतील, अशी अपेक्षा होती. परंतु, तेथे १.२५ वाजता भेट दिली असता कोणीही दिसून आले नाही. त्यामुळे वाहनधारक आपल्या मनाला वाटेल तशी वाहने चालवितांना दिसून आले. त्यानंतर १.२६ वाजता बसस्थानकासमोर एक वाहतूक पोलीस कर्मचारी वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत असताना दिसून आला. त्यानंतर १.३० वाजता उड्डाणपूल, १.३५ वाजता जांब नाका, १.४० वाजता रायगड कॉर्नर, १.४२ वाजता गणपती चौक, १.४५ विसावा कॉर्नर, १.५५ वाजता गांधी पार्क, २ वाजता नानलपेठ २.१५ वाजता नारायण चाळ, २.३० डॉक्टर लेन परिसरात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी आढळून आला नसल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे दिसून आले. वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असणे आवश्यक असतानाही ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत १८ पैकी केवळ चारच ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी दिसून आले.
अतिक्रमण मोहीम
केवळ देखावाच
चार दिवसांपासून महानगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरु आहे. या मोहिमेत अतिक्रमित साहित्य पथकाने हटविले. परंतु, मोहीम पुढे जाताच संबंधितांच्या वतीने ते साहित्य पुन्हा जैसे थेच मांडले जाते. त्यामुळे शहरात आजपर्यंत झालेल्या अतिक्रमण मोहिमा केवळ दिखावाच असल्याचे दिसून येत आहे.