परभणी : दुहेरीकरणानंतरही प्रवाशांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:39 PM2020-02-29T22:39:35+5:302020-02-29T22:40:20+5:30
मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुदखेड ते परभणी या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतरही नांदेड विभागाला पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा लूज टाईमचे नियोजन करता न आल्याने नांदेड ते परभणी हा दीड तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी पॅसेंजर रेल्वेगाड्या तीन तास वेळ घेत आहेत. परिणामी प्रवाशांची मागील अनेक वर्षांपासूनची कुचंबणा दुहेरीकरणानंतरही कायम असल्याचे दिसत आहे.
रेल्वे मार्गावरुन जास्तीत जास्त गाड्या धावाव्यात, कमी वेळेत अंतर पार करता यावे आणि मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, या हेतुने रेल्वे विभागाने मुदखेड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात मुदखेड ते परभणी दुहेरीमार्ग पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे गाड्या विना अडथळा धावतील, अशी प्रवाशांची अपेक्षा होती. जलद गाड्यांच्या प्रवासात काही थोड्या प्रमाणात सुधारणा झाली असली तरी सवारी गाड्यांचा प्रश्न मात्र कायम आहे. रेल्वे गाड्यांच्या लूज टाईमचे नियोजन होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निजामाबाद - पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी नांदेड येथून रेल्वे वेळापत्रकान्वये ४ वाजता निघून परभणी येथे ६.२० वाजता पोहचणे अपेक्षित आहे. मात्र या रेल्वेगाडीला मोठ्या प्रमाणात लूज टाईम दिला आहे. नांदेड येथून निघाल्यानंतर पूर्णा स्थानकावर साधारणत: अर्धा तास आणि त्यानंतर मिरखेल स्थानकावर एक तास ही रेल्वेगाडी कारण नसतानाही थांबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे नांदेडहून ४.४५ वाजता निघालेली नंदीग्राम एक्सप्रेस आणि ५.३० वाजता निघणारी पनवेल एक्सप्रेस या दोन्ही रेल्वेगाड्या पुढे सोडून त्यानंतर पंढरपूर पॅसेंजर रेल्वे परभणीकडे मार्गस्थ केली जात आहे. परिणामी, परभणीत ६.२० वाजता पोहोचणे अपेक्षित असणारी ही रेल्वेगाडी तब्बल १ तास उशिराने ७.२० पर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे दुहेरीकरण होऊनही प्रवाशांचा त्रास कायम असून रेल्वे प्रशासनाने वेळापत्रकाचे नियोजन करुन पॅसेंजर आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या वेळेत धावतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.