परभणी : दंगा नियंत्रणाच्या उपायांचे प्रात्यक्षिकासह दिले प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:28 PM2019-12-28T23:28:59+5:302019-12-28T23:29:26+5:30
दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी प्रत्यक्ष मॉकड्रिल करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवावे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी प्रत्यक्ष मॉकड्रिल करण्यात आले़
येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर गॅस सेलमधून हवेत फायरिंग करणे, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडणे,़ रबर बुलेट फायर आदी उपायांचे प्रात्यक्षिकही करण्यात आले़ यावेळी नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहाहत्तरे, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, सुनील पल्लेवाड आदी अधिकारी उपस्थित होते़ मुख्यालयातील राखीव फौजदार श्यामराव राठोड, अण्णा बोईनवाड यांनी प्रात्यक्षिक करून घेतले़ मोर्चा दरम्यान दंगा सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण मिळवायचे, सुरुवातीला जमावाला आवाहन करणे, आवाहनानंतरही जमाव पांगत नसेल तर आश्रूधुंराचे नळकांडे फोडणे, त्यानंतरही परिस्थितीत तणावग्रस्त असेल आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान वाढत असेल तर रबर बुलेट फायर आणि सर्वात शेवटी हवेत फायर करण्याचे प्रात्यक्षिक यावेळी करून दाखविण्यात आले़ त्याचप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये जखमींना उपचारासाठी नेणे, घटनेची माहिती वरिष्ठांना देत असताना सूचनांचे तंतोतंत पालन करणे आदींविषयी पोलीस कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले़
बगाटे यांचे मार्गदर्शन
शहरातील तीनही पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विशेष पोलीस कर्मचाºयांना प्रात्यक्षिक दिल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उपस्थित कर्मचाºयांना मार्गदर्शन केले़ आपतकालीन परिस्थिती कशी हाताळावी, याची माहिती दिली़