परभणी : ‘सीएए’च्या समर्थनार्थ तिरंगा रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:45 AM2019-12-31T00:45:35+5:302019-12-31T00:46:15+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ सोमवारी परभणी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून तिरंगा रॅली काढण्यात आली़ या रॅलीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दणाणून गेला़
केंद्र शासनाच्या सीएए व एनआरसी या दोन कायद्यांच्या समर्थनासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक समितीच्या वतीने सोमवारी तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते़ येथील शनिवार बाजारात दुपारी १२ वाजेच्या सुमारास समर्थक नागरिक एकत्र आले़ यावेळी उपस्थित नागरिकांना नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीला समर्थन का आहे, याची माहिती देण्यात आली़ त्यानंतर भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने ही रॅली काढण्यात आली़ ५०० फुट लांबीचा तिरंगा ध्वज घेवून ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली़ अग्रभागी महिला त्यानंतर पुरुष आणि त्यापाठोपाठ तिरंगा ध्वज घेवून नागरिक रॅलीत सहभागी झाले होते़ रॅली दरम्यान, वंदे मातरम्, भारत माता की जय, मोदी मोदी, हर हर महादेव, जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या़ शनिवार बाजार, शिवाजी चौक, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात दाखल झाली़ या रॅलीमध्ये कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला़ राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला़ रॅलीत आ़ मेघना बोर्डीकर, माजी आ़ मोहन फड, भाजपा जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, अनंत पांडे, अजित बनसोडे, सादेक इनामदार, गणेश रोकडे, अशोक डहाळे, राजकुमार भामरे, प्रल्हाद कानडे, बाळासाहेब भालेराव, रितेश जैन, जि़प़ सदस्य सुभाष कदम, दिनेश नरवाडकर, शिवप्रसाद कोरे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मोठ्या सहभाग होता़
शहरात तगडा पोलीस बंदोबस्त
४तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता़ कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी पोलीस प्रशासनाने घेतली़ शनिवार बाजार येथून निघालेल्या तिरंगा रॅलीसमोर पोलिसांची दोन वाहने होती़ तसेच संपूर्ण रॅली मार्गावर जागोजागी पोलीस बंदोबस्त लावला होता़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातही सर्व मार्र्गांवर पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती़ विशेष म्हणजे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा या स्वत: रॅलीचा समारोप होईपर्यंत या ठिकाणी तळ ठोकून होत्या़ तसेच रॅलीचा समारोप झाल्यानंतरही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पथसंचलन केले़
५०० फुटांचा तिरंगा
४सीएए कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीत नागरिकांनी डोक्यावर घेतलेला ५०० फुट लांबीचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरले होते़ संपूर्ण रस्ता व्यापून हा तिरंगा ध्वज रॅली मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आणण्यात आला़ यावेळी रॅलीतील नागरिकांनी वुई सपोर्ट सीएए, सीएए कायद्याला समर्थन आदी फलक हातात घेतले होते़