परभणी : विज्ञान दिनानिमित्त स्मशानभूमीत काढली सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:17 AM2019-03-03T00:17:43+5:302019-03-03T00:17:55+5:30
स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्मशानभूमीमध्ये भुतांचे वास्तव्य असते, असा मुलांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यासाठी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल चक्क स्मशानभूमीमध्ये नेण्यात आली. दिवसभर स्मशानभूमीत थांबून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्मशानभूमी म्हटलं की अंगावर काटा येतो. या ठिकाणी भुतांचा वावर असतो, अमावस्येला ही भूते बाहेर येतात, असे अनेक गैरसमज आहेत. विज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागात या समजुती अजूनही रुढ आहेत. विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची या विषयी जनजागृती व्हावी, ते विज्ञाननिष्ठ व्हावेत व भूत आणि भुतांबद्दलचा गैरसमज दूर व्हावा, या उद्देशाने टाकळी कुंभकर्ण येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच झरी येथील स्व.इंदिराबाई देशमुख वैकुंठधाम स्मशानभूमीत विद्यार्थ्यांना नेण्यात आले. या ठिकाणी चार ते पाच तास विद्यार्थी थांबले. घरुन तळून आणलेले भजे व इतर जेवण याच ठिकाणी त्यांनी केले.
विशेष म्हणजे, या स्मशानभूमीतील मसनजोगी पवार यांच्याशीही विद्यार्थ्यांनी संवाद साधला. पवार हे याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे सहा वर्षांचा त्यांचा नातूही स्मशानभूमीतच राहतो. यावेळी विद्यार्थ्यांनी भुतांबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी त्यांना विचारणा केली. स्मशानभूमीत तेलकट खाल्ल्याने भुते बाहेर येतात का? असाही प्रश्न या विद्यार्थ्यांनी केला. या सर्व गैरसमजुतीचे पवार आणि विज्ञान शिक्षक प्रकाश पंडित यांनी निराकरण केले.
४या शैक्षणिक सहलीविषयी माहिती देताना प्रकाश पंडित म्हणाले, शाळेमध्ये नित्यनेमाने विज्ञान उपक्रम राबविले जातात, फेब्रुवारी महिन्यात २८ तारखेला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव स्मशानभूमीत सहल नेण्याचा निर्णय घेतला. कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी झरी येथील स्मशानभूमीचे अतिशय रेखीवपणे सुशोभिकरण केले आहे. वेगवेगळी फुलांची झाडे, आकर्षक बांधकाम, आसन व्यवस्था, रंगरंगोटी, सुविचारांने ही स्मशानभूमी सजविली आहे. त्यामुळे या स्मशानभूमीत विद्यार्थ्यांची सहल घडविली, असे पंडित यांनी सांगितले.